पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार होत्या, मात्र करोनाच्या नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय दहा दिवस पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, शाळा सुरु करण्यासाठी कुठलीही अडचण नसल्याचे निर्वाळा आरोग्य मंत्र्यांनी नुकताच दिला होता….
यानंतर आज महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी नाशिक महापालिका हद्दीतल्या शाळा येत्या १३ डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१ डिसेंबरला सुरु होणाऱ्या शाळा 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात अशा सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केली होती. त्यांनतर आज पुन्हा आढावा बैठक पार पडली. या दिवसांत महापालिका हद्दीतल्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र भरून घेत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यात यावे असे सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे संमतीपत्र अनेक पालकांकडून भरून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय नेमकी कशी केली जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.











