गुणवत्ता, पटसंख्या वाढीसाठी झेडपी अधिकार्‍यांची एका दिवसाची शाळाभेट

0
197

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे, शाळांच्या पायाभूत सुविधा वाढवणे, सुविधांबाबतच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम जिल्हा परिषदेकडून राबविला जात आहे. यात जिल्हा परिषद पातळीवर सर्व विभाग प्रमुख, तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी आणि त्यांच्या विभागाचे सर्व प्रमुख महिन्यांतून एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी याबाबत नुकतेच खातेप्रमुखांना काढले आहेत.

जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी, तसेच शाळांना, शिक्षकांना काही सोई-सुविधांची गरज आहे का? हे पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, तसेच पंचायत समितीचे खातेप्रमुख यांनी महिन्यांतील तिसर्‍या गुरुवारी शाळांना भेटी द्याव्यात. यात अधिकार्‍यांनी ज्या शाळेला भेट देणार त्या शाळेतील शिक्षक उपस्थिती, विद्यार्थी उपस्थिती, शाळानुसार निकष पूर्तता, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, शैक्षणिक गुणवत्ता, शासकीय परीक्षांची तयारी, शाळा स्तरावरील समित्या, शासकीय योजनांचा लाभ आदी बाबींची तपासणी करून आढळलेल्या त्रुटी व उल्लेखनीय बाबींबाबत अभिप्राय द्यावेत. याशिवाय शाळेतील भौतिक सुविधांचा दर्जा, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक इतर सुविधा, शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांची शालेय प्रगती, शाळा व्यवस्थापन समिती गठण व बैठका, पटसंख्या, बायोमेट्रिक प्रणाली या आधारे मूल्यांकन करावे, असे आदेशात म्हटले आहे.

हा उपक्रम राबवण्यामागे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढण्यासह शाळांचे प्रभावी सनियंत्रण, शिक्षक व विद्यार्थी यांना सुयोग्य मार्गदर्शन, शाळांच्या पायाभूत सुविधांबाबतच्या समस्यांचे निराकरण, समाज, पालक यांचा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणे, जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवणे असे अनेक उद्देश आहेत. मुख्य कार्यकारी क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पुढे आला आहे.

Spread the love