राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी एसटी कर्मचाऱयांना चिथावणी दिल्याचा आरोप असणाऱया अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे. सदावर्ते हे एसटी कर्मचाऱयांचे वकील असून हल्ल्याचा कट रचणे आणि चिथावणी देणे या गुन्हय़ाखाली त्यांना पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली होती. किल्ला कोर्टाने सदावर्ते यांना पुढील तपासासाठी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून इतर 109 आंदोलक आरोपींना तत्काळ जामीन देण्यास नकार देत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
शुक्रवारी दुपारी शे-दीडशे एसटी कर्मचाऱयांनी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानात घुसून हल्ल्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलकांमध्ये 23 महिलांचाही सहभाग होता. आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनाही गावदेवी पोलीस ठाण्यात नेऊन कसून चौकशी केली होती. रात्री उशिरा सदावर्ते यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना आणि 109 आंदोलकांना आज किल्ला कोर्टात हजर केले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हल्ल्यामागे केवळ सदावर्ते हे एकटेच नाहीत, तर एक मोठी शक्ती कार्यरत असल्याचे सांगत सदावर्ते यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. मात्र सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांनी सरकारी पक्षाचे सर्व आरोप फेटाळत केवळ राजकीय हेतूने सदावर्ते यांना अटक झाल्याचा दावा केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती पैलास सावंत यांनी सदावर्ते यांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठवण्याचा आणि उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सदावर्ते यांना औषधे आणि वाचन करण्यासाठी दोन पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आदेशही न्या. सावंत यांनी दिले.
अटकेतील ते एसटी कर्मचारीच आहेत का?
आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात दोन पोलीस जखमी झाले असून एकजण गंभीर जखमी आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. त्यापैकी अनेकांनी खोटी नावे सांगितली असून पत्तेही चुकीचे सांगितले आहेत. त्यामुळे त्यांची पूर्ण नावे आणि खरे पत्ते शोधून काढायचे आहेत. या अटक कर्मचाऱयांत खरंच एसटी कर्मचारी होते की बाहेरचे कोणी होते, याचाही तपास करायचा आहे. त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली असून त्याचा अहवाल यायचा आहे. म्हणून 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली.
कर्मचाऱयांचे वकील काय म्हणाले…
109 आंदोलक कर्मचाऱयांच्या वतीने अॅड. संदीप गायकवाड यांनी बाजू मांडली. एसटी कर्मचाऱयांचा उद्देश कोर्टाने समजून घेतला पाहिजे. ते कर्मचारी आहेत. दाखलेबाज आरोपी नव्हेत. गेल्या पाच महिन्यांपासून घरदार सोडून ते आंदोलनाला बसले आहेत असे अॅड. गायकवाड यांनी न्यायालयाला सांगितले. या 109 आरोपींना जामीन मंजूर करावा, अशी विनंतीही केली. मात्र न्यायमूर्तींनी दोन्ही बाजू ऐकून सर्व आरोपींची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. न्यायमूर्तींनी त्यांना तत्काळ जामीन देण्यासही नकार दिला.
हल्ल्यापूर्वी सिल्व्हर ओकची रेकी
हल्ल्यापूर्वी एसटी कामगारांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाची रेकी केल्याचे स्पष्ट झाले आहे. सिल्व्हर ओकच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱयांच्या फुटेजमधून हे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत. सीडीआरच्या माध्यमातून पुढील तपास होत असल्याचे वृत्त आहे. ज्या कामगारांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत त्यांचा वावर शरद पवार यांच्या घराच्या परिसरात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पुढे आले आहे. कामगारांच्या संशयास्पद हालचालीही आढळून आल्या आहेत असे वृत्त आहे.
पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप सदावर्तेंनी केला. पण न्यायाधीश कैलास सावंत यांनी पाहणी केली तेव्हा त्यांना सदावर्तेंच्या अंगावर जखमा आढळल्या नाहीत.
पोलिसांनी हिंसक आंदोलनाचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून या हल्ल्यामागे काही लोकांचा हात असण्याची शक्यता आहे. ‘रॉयल स्टोन’ येथेही असेच आंदोलन होणार होते. यामागे कोणती शक्ती आहे ते पोलिसांना शोधायचे आहे.
– प्रदीप घरत, सरकारी वकील
बारामतीला जाऊन आंदोलन करणार असे गुणरत्न सदावर्ते बोलले होते, पण घरात घुसा असे ते कधीच बोलले नव्हते. पोलिसांचा दावा खोटा आहे. प्रसारमाध्यमांवर सदावर्तेंचे वक्तव्य दिसलेले नाही.
– महेश वासवानी, सदावर्तेंचे वकील
अशी घटना व्हायला नको – राज्यपाल
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एक प्रतिष्ठत व्यक्ती आहेत. त्यांच्या घरावर झालेला हल्ला हा निंदनीय आहे. अशी घटना पुन्हा होऊ नये. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळत आहेत, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.











