जळगाव संदेश
एका थाळीवर दोन थाळी मोफत असे सांगून ठगाने महिलेची 99 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूकप्रकरणी समतानगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार या कांदिवली परिसरात राहत असून त्या मोबाईलवर सर्फिंग करत असताना त्यांना एका हॉटेलची जाहिरात दिसली. त्या जाहिरातीत जेवणाची एक थाळी खरेदी करा आणि दोन थाळी मोफत मिळवा असे त्यात नमूद केले होते. त्या जाहिरातीच्या खाली एक नंबरदेखील लिहिला होता. ऑफर आवडल्याने महिलेने त्या नंबरवर फोन केला. तेव्हा ठगाने आपण एका प्रसिद्ध हॉटेलमधून बोलत असल्याचे भासवले.
थाळीसाठी दहा रुपये पाठवण्यास सांगितले. तसेच थाळी बुक करण्यासाठी एक लिंक पाठवत असून त्यावर माहिती अपलोड करण्यास सांगितली. त्यावर विश्वास ठेवून महिलेने त्या लिंकवर स्वतःची माहिती अपलोड केली. माहिती अपलोड केल्यानंतर महिलेच्या खात्यातून सुरुवातीला 49 हजार 760 रुपये काढले गेले. पैसे गेल्याचे लक्षात येताच महिलेने ठगाला फोन करून विचारणा केली. तेव्हा त्याने ते चुकून पैसे गेले असून ते पुन्हा तुमच्या खात्यात जमा केले जातील असे महिलेला सांगितले. सर्व्हरचा प्रॉब्लेम झाला असून ते पैसे दुसऱया खात्यात जमा करायचे असल्याने त्या खात्याची माहिती देण्यास सांगितली. महिलेने दुसऱया खात्याची माहिती देताच पुन्हा तिच्या खात्यातून पैसे काढले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने ते कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर महिलेने समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून समतानगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सायबर ठग हे नववर्ष किंवा एखाद्या सणाच्या काही दिवसअगोदर सोशल मीडियावर मेसेज पाठवून एका थाळीवर दोन थाळी मोफत असे भासवून बँक खात्यावर डल्ला मारतात. याबाबत मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हेदेखील दाखल आहेत.











