चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेलेआखतवाडे येथून प्रस्थान केलेल्या ह.भ.प.किशोर महाराज (सोनखेडीकर) यांच्या पंढरपूर पायी वारीत शेवगाव जिल्हा अहमदनगर येथून एक ‘श्वान’ (काळ्या रंगाचा कुत्रा) वारकऱ्यांसोबत पायी चालत होता.तो देखील दिंडीसोबत पंढरपुरात सुखरूप दाखल झाला आहे.हा श्वान दिंडीकरांचा लाडका वारकरी म्हणून कौतुकाचा विषय झाला आहे. १ जून रोजी वेले येथुन ह.भ.प.किशोर महाराज यांच्या दिंडीचा प्रस्थान सोहळा आनंदात संपन्न झाल्यानंतर दरकोस दरमुक्काम करीत पायी दिंडी जेव्हा नगर जिल्ह्यात पोहोचली,त्यावेळी शेवगाव मुक्कामी अनाहूतपणे हा मुका चार पायांचा वारकरी दिंडी सोबत चालू लागला. पहिल्या मुक्कामानंतर तो परत जाईल असे महाराजांसह वारकऱ्यांना वाटत होते.परंतु त्याने पंढरपूर पर्यंत दिंडीची साथ सोडली नाही.साक्षांत खंडेराव महाराज आपल्या सोबत चालत आहेत असेच वारकऱ्यांना वाटत होते.यामुळे सर्वांचा आनंद द्विगुणीत होऊन चालतांना उर्जा व प्रेरणा मिळत असल्याचे वारकरी बोलत होते.
यावेळी भुतदया म्हणून वारीतील सर्वांनी त्याला भोजन दिले,लळा लागला आणि तो देखील पांडुरंगाच्या भक्तीत चालत राहिला.दिंडी चंद्रभागेच्या काठावर पोहोचली तेव्हा तर आश्चर्यच झाले.श्वानाने सर्वात आधी चंद्रभागेत जाऊन उड्या मारून स्नान केले व काठावर येऊन वारकऱ्यांच्या साहित्या जवळच बसून राहिला.नंतर श्रीविठ्ठल मंदिराला दिंडीसोबत प्रदक्षिणा घातली. दिंडीचा मुक्काम नानाबुवा यांच्या मठात असुन तेथपर्यंत श्वान येऊन एका कोपऱ्यात विश्रांती घेत होता.दिंडीचे प्रचारक जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बु) यांनी तर या श्वाना प्रती मनोभावे आदर व्यक्त केला आहे.’संसारी मानवाला पैसा, सत्ता, मोह असतो,परंतु मुक्या प्राण्यालाही भगवद् भक्तीचा व्यासंग लागणे हे ही कौतुकाचे आहे,’असेही मत ज्येष्ठ पत्रकार लेखक कवी रमेश जे.पाटील (आडगाव) यांनी याबाबत व्यक्त केले आहे.











