एकनाथ शिंदे गटाकडुन कोणाला मिळणार मंत्री पद. संभाव्य यादी आली समोर.

0
38

मुंबई: ‘तारीख पे तारीख’ आणि कधी होणार, कधी होणार? असा विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जात असतानाच राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

मंत्रिमंडळ विस्तार उद्या, मंगळवारी होणार असून, आता पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळणार याची संभाव्य यादीत समोर आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून सहा आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा सतत पुढे ढकलण्यात येत असल्याने विरोधकांकडून वारंवार टीकेची झोड उठवली जात होती. अखेर मंत्रिमंडळ विस्तार उद्या, मंगळवारी होत आहे. मंत्रिपदाची शपथ कोण घेणार, कुणाची वर्णी लागणार, तर कुणाला अजून वाट पाहावी लागणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे गटाकडून संभाव्य नावांची यादी समोर आली आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून सहा आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होण्याची शक्यता आहे. उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार आणि शंभुराज देसाई यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते, अशी माहिती मिळतेय.

भाजपकडून ‘यांना’ मिळणार संधी?

भाजपकडूनही संभाव्य मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, नितेश राणे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना प्राधान्य

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. मंत्रिपद मिळेल अशी अनेकांना आशा आहे. पण मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी मिळणार आहे, असे कळते. त्याबाबत काही नावांवर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असावा, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे, असेही सांगण्यात येत आहे.

Spread the love