युएमटी राजा असे या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून तो तमिळनाडूतील कोईम्बतुर जिल्ह्यातील कुनियामुथूरचा (Tamil Nadu, Coimbatore) रहिवासी आहे. डोळ्यात तिरंगा रंगवतानाचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
युएमटी राजा लघुचित्रकारही असून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत त्यांनी डोळ्यात तिरंगा रंगवण्यास सुरुवात केली. अंड्याच्या कवचातील पांढऱ्या भ्रूणावरील अत्यंत पातळ फिल्मवर तिरंग्याचे लघुचित्र रेखाटण्यात आले असून त्यानंतर डोळ्यावरील पांढऱ्या बुबळावर चिकटवले. यासाठी त्यांनी तासभर मेहनत घेतली.
राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी डोळ्यामध्ये तिरंगा रंगवला असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत सांगितले आहे. विशेष म्हणजे युएमटी राजा यांनी त्यांच्या कृतीचे अनुकरण न करण्याचा सल्ला दिला आहे. अशा कृतींमुळे डोळ्यात ऍलर्जी आणि खाज सुटते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे यामुळे संसर्गाचा धोकाही आहे. त्यामुळे अशा गोष्टी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, लोकांमध्ये देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्व देशवासियांना घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना 2 ते 15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्य दिनापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांचे डिपी बदलून राष्ट्रध्वज ठेवण्यास सांगितले आहे. त्यांच्या आवाहनानंतर सर्वसामान्य लोकांसह राजकीय नेते आणि सेलिब्रेटींनीही आपला डिपी बदलला आहे.










