आपचे खासदार संजय सिंह यांनी भाजपचे एक रेटकार्ड जाहीर केलंय. आपच्या 4 आमदारांना भाजपने फोडण्याचा प्रयत्न केला होता. या चौघांना भाजपने काय ऑफर दिली होती याचा खुलासा संजय सिंह यांनी केला आहे. पक्ष सोडून भाजपमध्ये न आल्यास या आमदारांच्या मागे सीबीआय, ईडीचा ससेमिरा लावण्याची धमकी देण्यात आली होती असं सिंह यांनी म्हटलं आहे.
भाजपने आपच्या 4 आमदारांशी संपर्क साधून आमच्या पक्षात आलात तर प्रत्येकी 20 कोटी रुपये मिळतील असं आश्वासन दिलं होतं. या आमदारांनी त्यांच्यासोबत पक्षातील इतर नेत्यांना सोबत आणलं तर 20 ऐवजी 25 कोटी रुपये मिळतील असं आमिष भाजपने दिलं होतं असा आरोप संजय सिंह यांनी केला आहे.
संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केला. आम आदमी पार्टीच्या संजिव झा, सोमनाथ भारती, कुलदीप कुमार यांच्यासह चार आमदारांना 20-20 कोटींची ऑफर देण्यात आली. याची रेकॉर्डिंगही असल्याचा दावा संजय सिंह यांनी केला. भाजप बऱ्याच काळापासून आपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीमध्ये पहिल्यांदा सरकार स्थापन केल्यापासून भाजपचा प्रयत्न सुरू असून ते प्रत्येक वेळी तोंडघशी पडल्याचे संजय सिंह यांनी म्हटले.
संजय सिंह यांनी केंद्र सरकारवरही यावेळी निशाणा साधला. ईडी आणि सीबीआय फक्त सरकार पाडण्यासाठी आणि फोडाफोड करणाऱ्या संस्था बनल्या आहेत का? कारण या संस्था सध्या केंद्राच्या इशाऱ्यावर काम करतायंत, आणि राज्य सरकारे पाडण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. परंतु दिल्लीमध्ये या संस्था फेल राहिल्या. तसेच पंतप्रधानांसाठी अरविंद केजरीवाल यांची वाढती लोकप्रियता महत्त्वाचा मुद्दा असल्याचे खोचक टोलाही त्यांनी लगावला.
आप फोडा, भाजपात या!
आम आदमी पक्ष फोडा आणि भाजपात या. तुम्हाला मुख्यमंत्री करू. ईडी, सीबीआयची चौकशी बंद करू, अशी ऑफरच भाजपने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिली आहे. खुद्द सिसोदिया यांनीच भांडाफोड करून भाजपचा हा कुटील डाव उघड केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.










