कुऱ्हा पानाचे शिवारात वन्य प्राण्यांकडून कापूस पिकाचे नुकसान !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ -: येथून जवळच असलेल्या कुऱ्हा पानाचे येथील शिवारात उन्हाळी लागवड कपाशी पिक दि.४ जून रोजी बागायती कपाशीची लागवड केली होती. तरी रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांनी संपूर्ण कपाशीचे क्षेत्र उध्वस्त केले. कुऱ्हा पानाचे शिवारातील गट नंबर ३९ मधील शेतकरी मधुकर काशीराम बावस्कर यांनी लावलेला एक हेक्टर उन्हाळी बागायती कपाशी पूर्णपणे वन्य प्राण्यांनी खाऊन टाकले तसेच तुषार सिंचन नळ्यांचे सुद्धा नासधूस केली. सदर कापूस पिकाच्या लागवडीसाठी १५ ते २० हजार रुपये पर्यंत खर्च आला होता. तिव्र उन्हाळ्यात शेतातील पाण्याची कमतरता झाल्यामुळे टँकरने सुद्धा पाणी दिले .वन्य प्राण्यांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी शेतकरी स्वतःच्या पातळीवर अनेक उपाययोजना करताना दिसतात. यामध्ये शेताभोवती काटेरी कुंपण, साड्यांचे कुंपण (पडदे) लावणे, पत्र्याची डबडी वाजवणे किंवा रात्री शेतात जागून पिकाची राखण करणे यांसारख्या क्लृप्त्यांचा समावेश असतो .वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचे झटका मशीन यांचाही उपयोग होत नाही. वन विभाग ही वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ठरलेला आहे मात्र झालेल्या पिक नुकसानीचे भरपाई अत्यंत तुटपुंजी देतात आणि त्यालाही प्रचंड प्रमाणात विलंब असतो अशी व्यथा शेतकऱ्याने बोलून दाखवली.

या परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून आता शेतकऱ्यांनी पेरणी करावी तरी कशी असे मत अरविंद बाविस्कर यांनी मांडले असून वन्यप्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मुक्ती मिळावी अशी मागणी केली जात आहे.

Spread the love