जळगाव | प्रतिनिधी
तुळशीला बहुउद्देशीय संस्था, जळगावचे अध्यक्ष श्री. तुषार निर्मलाई वसंतराव सैंदाणे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यानिमित्ताने विपश्यना केंद्र उमाळे, एम.आय.डी.सी. परिसर तसेच कचरा फॅक्टरीलगत नव्याने विकसित होत असलेल्या फोर लेन महामार्गाच्या कडेला तब्बल २०० वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमासाठी श्री. प्रविणजी वाणी, श्री. तुषारभाऊ सैंदाणे, श्री. विशालभाऊ हिरे, सोनूभाऊ सोनवणे तसेच तुषारभाऊ सैंदाणे मित्र परिवार, जळगाव यांनी पुढाकार घेतला आहे. वाढदिवस साजरा करण्याची पारंपरिक पद्धत बाजूला ठेवून समाजहित आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत हा उपक्रम राबविला जात असल्याने सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
वाढते प्रदूषण, कमी होत चाललेले वनक्षेत्र आणि बदलते हवामान यामुळे वृक्षसंवर्धनाची गरज अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर २०० वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचाही निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. केवळ वृक्ष लागवड न करता त्यांचे नियमित जतन व संवर्धन करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार असून नागरिकांनीही वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी सकारात्मक कार्य करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन केल्यास पर्यावरण संरक्षणाची मोठी चळवळ उभी राहू शकते,” अशी भावना तुषारभाऊ सैंदाणे मित्र परिवाराने व्यक्त केली.
या उपक्रमामुळे तुषारभाऊ सैंदाणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगाव शहर व परिसरात पर्यावरण संवर्धनाचा एक प्रेरणादायी संदेश दिला जात आहे.












