प्रतिनिधी – उध्दव मामडे
उमरी: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2026– 2031 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमरी तालुक्यातून उमरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा स्वर्गीय आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे सुपुत्र कैलासभाऊ देशमुख गोरठेकर हे मंगळवार, दि. 30 जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उमरी तालुक्यात सहकार क्षेत्रात गोरठेकर कुटुंबाची अनेक वर्षांची परंपरा असून शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क राहिला आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामे राबविताना मिळालेला अनुभव तसेच सहकार क्षेत्रातील सक्रिय कार्यामुळे कैलासभाऊ गोरठेकर यांच्याविषयी कार्यकर्ते व सभासदांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
मागील पाच वर्षांच्या संचालकपदाच्या कार्यकाळात कैलास देशमुख गोरठेकर यांनी शेतकरी, सभासद आणि सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा बँकेच्या स्तरावर सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे अनेक सभासद व शेतकरी त्यांच्याकडून पुन्हा प्रभावी प्रतिनिधित्वाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
जिल्हा बँकेच्या संचालकपदी पुन्हा संधी मिळाल्यास शेतकरी, सभासद, सहकारी संस्था आणि ग्रामीण विकासाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या 23 जागांसाठी 26 जुलै रोजी मतदान, तर 28 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. उमरी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या मतांवर या निवडणुकीचे गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने कैलास देशमुख गोरठेकर यांच्या उमेदवारीने निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच कैलास देशमुख गोरठेकर यांनी गावोगावी जाऊन सभासदांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून, सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या निर्धारासह त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यानां चांगला प्रतिसाद मिळत आहे.










