उमरी, प्रतिनिधी (उद्धव मामडे) मृग नक्षत्र लागून तब्बल १९ ते २० दिवस उलटूनही धानोरा बु.सह उमरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम असून खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत.
यंदाच्या खरीप हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेताची मशागत पूर्ण करून पेरणीची तयारी केली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने पेरणीच्या कामांना विलंब होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. वेळेत पाऊस न झाल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रविवारपासून वातावरणात काहीसा बदल जाणवत असून काही भागांत थंड तर काही ठिकाणी उष्ण वारे वाहत आहेत. आकाशात पावसाळी ढगांची गर्दी दिसून येत असली तरी अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे “वरुणराजा नेमका केव्हा बरसणार?” हा प्रश्न शेतकरी आणि नागरिकांना सतावत आहे.
दरम्यान, वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांसह पशू-पक्षी आणि वन्यजीवही त्रस्त झाले आहेत. विहिरी, तलाव आणि बोअरवेलमधील पाणीपातळी घटल्याने अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आभाळात ढगांची वर्दळ वाढल्याने पावसाची आशा निर्माण झाली असली तरी प्रत्यक्षात पावसाच्या सरी कोसळण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. “बरस रे वरुणराजा, तहानलेल्या धरतीची तहान भागव,” अशी आर्त हाक शेतकरी व नागरिकांकडून दिली जात आहे.
सध्या धानोरा बु.सह उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले असून, लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












