विदगाव येथे जीपीएस फाउंडेशनतर्फे भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

0
8

विदगाव (ता. जळगाव, प्रतिनिधी) : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जीपीएस फाउंडेशनतर्फे तसेच आर. आर. झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने विदगाव येथे भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरामध्ये 120 हून अधिक लाभार्थ्यांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली. तपासणीनंतर 24 लाभार्थ्यांमध्ये मोतीबिंदू आढळून आला असून त्यांना मोफत शस्त्रक्रियेसाठी आर. आर. झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथे पाठविण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांना दिनांक 9 जुलै 2026 रोजी पनवेल येथे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या शिबिरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज फिरते नेत्रालय उपलब्ध करून देण्यात आले होते. यामध्ये मोतीबिंदू तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणी, नेत्ररोगांचे निदान तसेच डोळ्यांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शिबिरासाठी डॉ. मोहसीन सय्यद, डॉ. गुरुनाथ गोटे व डॉ. विजय बामणे यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांची सखोल तपासणी केली. डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे अनेक नागरिकांना डोळ्यांच्या आजारांचे वेळेवर निदान होण्यास मदत झाली.

यावेळी विदगावचे माजी पंचायत समिती सभापती जनार्दन आप्पा, ग्रामपंचायत उपसरपंच महेंद्र कोळी, ग्रामपंचायत अधिकारी विजय महाजन, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर कोळी, योगेश सपकाळे, निधूर येथील पोलीस पाटील प्रमोद पाटील, भुवनेश्वर चव्हाण, मुरलीधर काशिनाथ कोळी, संजय काशिनाथ कोळी, वसंत पाटील, निलेश सपकाळे, जगदीश सोनवणे, आनंद माळी, आवारे येथील सरपंच सुनील सपकाळे, पंकज सपकाळे, दिलीप कोळी, स्वप्निल कोळी व रवींद्र कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीतून आणि जीपीएस फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या नेत्रतपासणी शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना मोफत उपचाराची संधी उपलब्ध झाली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले असून, भविष्यातही अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Spread the love