प्रतिनिधी | ममुराबाद, ता. जि. जळगाव
ममुराबाद–जळगाव दरम्यानच्या बायपास मार्गावरील बोगद्याखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्याचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून ममुराबादकडे येणाऱ्या बायपास मार्गावरील बोगद्यालगतच्या एका शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्ता बांधकामावेळी पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करण्यात आली नसल्याने संबंधित शेतकऱ्याच्या कापूस लागवड केलेल्या शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली.
या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्याने दुपारच्या सुमारास शेतातील साचलेले पाणी वाहतुकीच्या रस्त्याकडे वळविल्याने ते थेट बायपासच्या बोगद्यात जमा झाले. परिणामी बोगद्याखाली गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचले असून, रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी आणि पादचारी यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.
अनेक वाहनचालकांना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने वाहने बंद पडण्याची तसेच अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनीही या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला आहे.
नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून बोगद्याखाली साचलेले पाणी त्वरित उपसावे, पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि वाहनधारकांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.












