तिसऱ्या मजल्याच्या बांधकाम परवानगीची बनावट कागदपत्रे दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक

0
2

जळगाव : तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाची महापालिकेची परवानगी असल्याचे भासवून खोटे व बनावट कागदपत्रे दाखवत हॉटेल व्यावसायिक तथा इस्टेट ब्रोकर सुरेश नंदलाल तलरेजा (वय ६३, रा. गणपती नगर) यांची तब्बल ३ कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सन २०२१ पासून सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी शहर पोलिस ठाण्यात के. पी. इन्फ्रास्ट्रक्चर व त्याच्या प्रोप्रायटर ममता साहित्या, अनिल खूबचंद साहित्या, खुबचंद प्रेमचंद साहित्या, नितीन खूबचंद साहित्या, जयराम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स प्रा. लि. तसेच विशाल रामगोपाल शर्मा (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या सही-शिक्क्याची कागदपत्रे दाखविल्याचा आरोप

फिर्यादी सुरेश तलरेजा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, साहित्या कुटुंबीयांनी ‘संत बाबा हरदासराम शॉपिंग कॉम्प्लेक्स’ या व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावरील बांधकामाबाबत महापालिका अधिकाऱ्यांच्या सही व शिक्क्याची कागदपत्रे त्यांना दाखविली. ही कागदपत्रे खरी असल्याचे समजून तलरेजा यांनी रोख रक्कम तसेच बँक व्यवहारांद्वारे मोठी रक्कम दिली.

सुरुवातीला सौदापावती आणि त्यानंतर लेखी ताबा पावती देऊन संबंधित जागेचा प्रत्यक्ष ताबाही तलरेजा यांना देण्यात आला.

जागेवर कार्यालय व रीडिंग रूम सुरू

ताबा मिळाल्यानंतर तलरेजा यांनी संबंधित जागेवर इस्टेट ब्रोकरचे कार्यालय तसेच रीडिंग रूम सुरू केली. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मात्र, त्यांच्या ताब्यात असलेल्या या मिळकतीचा परस्पर इतर व्यक्तींशी व्यवहार करण्यात आल्याची माहिती जुलै २०२६ मध्ये तलरेजा यांना मिळाली.

महापालिकेच्या चौकशीत धक्कादायक बाब उघड

यानंतर तलरेजा यांनी महापालिकेत चौकशी केली असता संबंधित व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत बांधकाम करण्याची परवानगीच नसल्याचे समोर आले. त्यामुळे आपल्याला खोटे व बनावट कागदपत्रे दाखवून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

तलरेजा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Spread the love