ममुराबादमधील चोरीस गेलेल्या विद्युत तारांचा तपास लागेना; शेतकरी त्रस्त

0
5

किनगावातील चोरीप्रकरणी १० संशयितांना पुन्हा अटक; मात्र ममुराबादच्या प्रकरणाचा तपास कुठे?

जळगाव प्रतिनिधी : किनगाव शिवारातील विद्युत तार व केबल वायर चोरीप्रकरणी यावल पोलिसांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून १० संशयितांना पुन्हा ताब्यात घेतले असून, त्यांना यावल व भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही न्यायालयांनी या सर्व १० संशयितांना दि. ३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मात्र, ममुराबाद परिसरातून चोरीस गेलेल्या विद्युत तारांच्या प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एका बाजूला किनगाव व परिसरातील विद्युत तार आणि केबल चोरीप्रकरणी पोलिसांकडून संशयितांना पुन्हा ताब्यात घेऊन तपास सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला ममुराबाद परिसरातील चोरीच्या घटनांमध्ये अद्याप ठोस तपास किंवा कारवाई का झालेली नाही, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

किनगावपासून मालोदकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेतशिवारात विद्युत वितरण कंपनीच्या तारांची चोरी झाल्याप्रकरणी यापूर्वी १० जणांना अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

दरम्यान, बुधवारी रात्री यावल शेतशिवारातून विद्युत तार चोरीप्रकरणी अनिल शिंदे यांनी यावल पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात नाशिक कारागृहातून सुपडू हमजान तडवी, करीम नशीर तडवी, अलाउद्दीन मजीद तडवी आणि आरिफ युसुफ मन्यार या चौघांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमित तडवी व सुनील पाटील करीत आहेत.

तसेच किनगाव प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आसिफ जुम्मा तडवी, अफसर अकबर तडवी, खुदाबक्ष रशीद तडवी, विनोद मेहरबान तडवी, हैदर बशारत तडवी आणि सलीम भिका तडवी (सर्व रा. मालोद, ता. यावल) यांना शिरसाड शिवारातील केबल वायर चोरीप्रकरणी नारायण चौधरी यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात यावल पोलिसांनी कारागृहातून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे व हवालदार रोहिल गणेश करीत आहेत.

ममुराबादच्या शेतकऱ्यांचा सवाल

ममुराबाद परिसरातील शेतशिवारातून चोरीस गेलेल्या विद्युत तारांचा तपास अद्याप पुढे का सरकलेला नाही? चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असताना संबंधित प्रकरणात संशयितांचा शोध आणि चोरीचा माल हस्तगत करण्याबाबत पोलिसांकडून काय कार्यवाही करण्यात आली, याची माहिती देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

किनगाव परिसरातील चोरीप्रकरणी पोलिसांची कारवाई होत असताना ममुराबादच्या चोरीप्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ममुराबाद परिसरातील विद्युत तार चोरीच्या घटनांचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करावी आणि चोरीस गेलेल्या साहित्याचा शोध घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Spread the love