वरणगावात तरुणावर गोळीबार; २३ वर्षीय युवक गंभीर जखमी

0
2

अज्ञात हल्लेखोराच्या गोळीबाराने शहरात खळबळ; कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

वरणगाव : शहरात एका २३ वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मुक्ताईनगर येथील काजीपुरा परिसरातील सर्फराज सय्यद हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे वरणगाव शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्फराज सय्यद हा एका कंपनीत डंपर चालक म्हणून काम करतो. कामाच्या निमित्ताने तो वरणगाव परिसरात आला असताना अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, वरणगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी रामपेठ परिसरातील सट्टा पेढीवर गोळीबार झाल्याची चर्चा होती. तसेच शहरात अवैध सट्टा व्यवसाय आणि विनापरवाना बनावट देशी दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत.

शहरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे. गोळीबाराच्या घटनेतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, तसेच शहरातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आता या गोळीबार प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि पोलीस प्रशासन आरोपींना गजाआड करण्यासाठी काय पावले उचलते, याकडे वरणगाव शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Spread the love