( वराडसीम गावात स्वच्छता अभियान )
प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वराडसिम गावात ग्रामस्वच्छता अभियान व विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या उपक्रमांतर्गत सकाळी ८ ते ९ या वेळेत गावातील बसस्थानक व सभोवतालच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गावातील विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनतीने व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत श्रमदानातून परिसर स्वच्छ केला. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाला मा. प्रशांतजी दरेकर साहेब (परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
साहेबांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला बचत गटाच्या महिलांनी दरेकर साहेबांचे स्वागत व सत्कार केला.
त्यानंतर शहीद प्रकाश जुलालसिंग पाटील सभागृहात आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात दरेकर साहेबांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच शिस्त, सामाजिक जबाबदारी, स्वच्छता आणि देशहिताची जाणीव ठेवून आपले भविष्य घडवावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला गावचे पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंचांचे पती, महिला बचत गटाच्या महिला, गावातील युवक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गावातील विद्यार्थ्यांनी दाखवलेली मेहनत, एकजूट आणि सामाजिक बांधिलकी होय. गाव स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर ठेवला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे मा. प्रशांतजी दरेकर साहेब, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गट, पोलीस पाटील, युवक, ग्रामस्थ आणि विशेषतः स्वच्छता अभियानात मेहनत घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.












