भुसावळमध्ये रेल्वे अपघातात अनोळखी पुरुषाचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

0
3

प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ :

भुसावळ रेल्वे परिसरात रेल्वे अपघातात एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी भुसावळ तालुका पोलिसांकडून नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे ५५ वर्षे वयाचा एक पुरुष दि. ३० मे २०२६ रोजी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांपूर्वी रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडला. रेल्वे सी-कॅबिन, भुसावळ येथून प्राप्त झालेल्या मेमोच्या आधारे भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २१/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

अपघाताची तीव्रता अधिक असल्याने मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप झाला असून हात-पायही गंभीररीत्या छिन्नविछिन्न झाले आहेत. त्यामुळे मृताची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. पोलिसांकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

सदर मृत व्यक्तीबाबत कोणाकडेही माहिती असल्यास किंवा आपल्या घरातील, परिसरातील अथवा परिचयातील एखादी व्यक्ती बेपत्ता असल्यास भुसावळ तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या प्रकरणी अधिक माहितीसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज येऊलकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love