प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे रोटरी क्लब भुसावळ व कांताई नेत्रालय जळगाव तसेच परिसरातील पदाधिकारी यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कुऱ्हे पानाचे येथे आयोजित करण्यात आलेल्या नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ३२० नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली, तर ४४ गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या उपक्रमामुळे अनेक नागरिकांच्या जीवनात पुन्हा एकदा दृष्टीचा प्रकाश निर्माण होण्यास मदत झाली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सेवाभावी दृष्टिकोनातून अशा लोकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन मिळत आहे. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्णांना डोळ्यांच्या आजारांवर वेळेत तपासणी व उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.
विशेष म्हणजे, आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा नागरिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलतात. अशा रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होणे ही त्यांच्यासाठी मोठी दिलासादायक बाब आहे.
आरोग्यसेवा म्हणजे माणुसकीचा प्रकाश!
३२० नागरिकांची तपासणी आणि ४४ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही केवळ आकडेवारी नाही, तर ती अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करणारी सामाजिक सेवा आहे.
या स्तुत्य उपक्रमासाठी आरोग्य अधिकारी श्री. उमेश बडगुजर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय पथक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
“दृष्टी मिळाली की जग सुंदर दिसते; पण दुसऱ्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश निर्माण करणारे हात खऱ्या अर्थाने माणुसकीचे असतात!”
अशा आरोग्यदायी उपक्रमांची व्याप्ती वाढावी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचावी अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.








