मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना दालनाबाहेर दीड-दोन तास ताटकळत ठेवलं

0
38

वेदांता-फॉक्सकॉनसारखा लाखोंचा रोजगार निर्माण करू शकणारा प्रकल्प महाराष्ट्राकडून गुजरातमध्ये गेल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे. याच दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना भेट देणे टाळल्याचेही समोर येत आहे.

राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट देणे टाळल्याचे समजते. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत तसेच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. एकनाथ शिंदे यांच्या दालनाबाहेर ते त्यांच्या भेटीची वाट पाहत होते. मात्र शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी आलेल्यांनाच एकनाथ शिंदे भेटत होते. संभाजीराजेंकडून वारंवार निरोप जाऊनही एकनाथ शिंदे यांनी त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे दीड दोन तास वाट पाहून मुख्यमंत्री शिंदे भेट देत नसल्याने संभाजीराजे छत्रपती हे मंत्रालयातून तडकाफडकी निघून गेल्याचे समजते. यावेळी संभाजीराजेंसोबत मराठा समाजाचे काही प्रतिनिधीही होते.

त्यावरून राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला होता. माझं स्पष्ट मत आहे की, आपण माहिती घेतली पाहिजे की एवढा मोठा प्रोजेक्ट राज्यात येत असताना बाहेर जातोच कसा? एवढा मोठा रोजगार देत असेल तर तो महाराष्ट्रातून बाहेर का निघाला? मला मुद्दाम आठवण करून द्यायची आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना एक प्रोजेक्ट आंध्रप्रदेश किंवा गुजरातला जाणार होता. मी त्या दिवशी बसून तो फायन करून तो संभाजीनगरला आणला. मग हा ग्रुप का बाहेर गेला याचं निश्चित संशोधन होणं गरजेचं आहे. पुढे ते काय देतील तो नंतरचा प्रश्न आहे. पण इथला प्रकल्प जाता कामा नये. महाराष्ट्रातील लोकांना रोजगार मिळायला हवा’.

Spread the love