जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हिंदुस्थानात बनवलेल्या खोकल्याच्या चार सिरपसंदर्भात अॅलर्ट दिल्यानंतर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने गॅम्बियातील मुलांमध्ये आढळलेल्या मूत्रपिंडाशी निगडित दुखापतींशी आणि 66 मृत्यूशी संबंधित असलेल्या औषधांची तपासणी सुरू केली आहे.
मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेड, हरियाणा द्वारे निर्मित चार कफ सिरप, प्रोमेथाझिन ओरल सोल्यूशन, कोफेक्समालिन बेबी कॉफ सिरप, मेकॉफ बेबी कॉफ सिरप, आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप, त्यांच्यामध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची प्रमाणापेक्षा अधिक मात्रा असल्याचे आढळून आल्याचे समोर आले आहे.
‘आजपर्यंत, नमूद केलेल्या निर्मात्याने या उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल आणि गुणवत्तेबद्दल WHO ला हमी दिलेली नाही. ही चार उत्पादने गॅम्बियामध्ये आढळली आहेत, परंतु अनौपचारिकरित्या बाजारपेठांमधून, इतर देशांना किंवा प्रदेशांमध्ये वितरित केली गेली असतील,’ अशी शक्यता WHO ने वर्तविली.
डायथिलीन ग्लायकोल म्हणजे काय आणि ते धोकादायक का आहे?
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की डायथिलीन ग्लायकोल (डीईजी) किंवा इथिलीन ग्लायकोल सेवन केल्यावर ते मानवांसाठी विषारी आहे आणि ते प्राणघातक ठरू शकते. हे मूत्रपिंड आणि न्यूरोलॉजिकल विषारीपणास कारणीभूत ठरू शकते आणि औषधांद्वारे सेवन केल्यावर सामूहिक विषबाधाच्या अनेक प्रकरणांशी संबंधित आहे.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन अंतर्गत नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमधील एका पेपरनुसार, हे रसायन अँटीफ्रीझ, ब्रेक फ्लुइड्स, सौंदर्यप्रसाधने यात वापरले जाते आणि त्यामुळे मूत्रपिंड निकामी होते आणि त्यामुळे कोमा आणि मृत्यू देखील होऊ शकतो.











