ट्रक आणि क्रूझरच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण जखमी झाले आहेत. हा अपघात अंबाजोगाई शहराजवळ घडला. मृतांमध्ये 6 महिलांचा आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे आयोजित केलेल्या मावद्यांच्या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील आर्वी येथील नातेवाईक सकाळी लातूरहून अंबाजोगाईकडे निघाले होते. अंबाजोगाई शहराजवळ पोहोचण्यापूर्वीच नंदगोपाल दूध डेअरीसमोरून आलेल्या भरधाव ट्रकने क्रूझरला धडक दिली. त्यात क्रूझरचा चेंदामेंदा झाला. क्रूझरमधील 19 प्रवाशांपैकी 8 प्रवाशांचा मृत्यू झाला. इतर 11 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. स्थानिक नागरिकांनीही मदत केली. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. त्यात निर्मला सोमवंशी (38, रा.अंबाजोगाई), स्वाती बोडखे (35, रा.कन्हेरा, ता.औसा), शकुंतला सोमवंशी (38, रा.आर्वी, ता.लातूर), सोजरबाई कदम (37, रा.मालावती, ता.लातूर), सिमा शिंदे (35, रा.कासरखेडा, ता.लातूर), चालक खंडू रोहिले (30, रा.लातूर) यांच्यासह एका लहान मुलाचा मृत्यू झाला. तर लातूरला उपचार घेत असलेल्या कोमल जाधव (30) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातामध्ये आठ कुटुंबियांवर काळाने घाला घातला. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश होत होता. उपचारासाठी स्वाराती रूग्णालयामध्ये जखमींना दाखल केल्यानंतर तेथेही नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
अपघातातील 11 जखमींची नावे
राजमती सोमवंशी (50, रा.केज), सोनाली सोमवंशी (25, रा.अंबाजोगाई), रंजना राजेंद्र माने (35, रा.केज), प्रमिला सोमवंशी (70, रा.अंबाजोगाई), दत्तात्रय पवार (40, रा.केज), यश परमेश्वर बोडखे (9, रा.अंबाजोगाई), शिवाजी पवार (45, रा.अंबाजोगाई), श्रुतिका तानाजी पवार (64, रा.अंबाजोगाई), गुलाबराव सोमवंशी (75, रा.आर्वी), साक्षी सुनील जाधव (16, रा.रेणापूर), प्रथमेश राजाभाऊ सोमवंशी (14, रा.आर्वी).










