कॅबिनेट मंत्रिपद देण्याच्या दलालीसाठी आमदारांकडून शंभर कोटींची मागणी करणाऱया शिरोलीच्या रियाज शेख याची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, तुरुंगातून जामिनावर सुटून शिरोलीत घरी येताना रात्री अकराच्या सुमारास रोड शो, फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत स्टंटबाजी केली.
याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज अल्लाबक्ष शेख, युनूस अजीज शेख, मतिन शब्बीर महात, सिकंदर नूरमहंमद कवठेकर, रशिदा अल्लाबक्ष शेख, पायल शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
17 जुलै 2022 रोजी मुंबई येथील हॉटेल ओबेरॉय येथे भाजपचे आमदार राहुल कुल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली शंभर कोटी रुपयांची मागणी करणारी टोळी अटक केली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार रियाज अल्लाबक्ष शेख (वय 41, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) व त्याचे इतर तीन साथीदार योगेश मधुकर कुलकर्णी (वय 57, रा. पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय 37, रा. पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (वय 53, रा. नागपाडा, मुंबई) हे होते. आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून मुंबई गुन्हे शाखेने चौघांना 17 जुलै 2022 रोजी अटक केली होती.
यातील मुख्य सूत्रधार शिरोलीचा रियाज शेख जामिनावर सुटला आणि 2 ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास शिरोलीत आला. महामार्गालगतच शंभर मीटरवर त्याचे घर आहे. रात्री 11 वाजता घरी येताना एखादे मोठे युद्ध जिंकून, मोठा पराक्रम करून आल्याप्रमाणे किंवा कुस्तीचे मैदान जिंकल्याप्रमाणे त्याने आलिशान गाडीच्या बोनेटवर बसून रोड शो केला. यावेळी फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत मोठी स्टंटबाजी केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला हा व्हिडीओ मिळाला. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजय बोर्ले, सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार, सागर पाटील यांनी रियाज शेखला शुक्रवारी रात्री आठ वाजता घरातून ताब्यात घेतले. या रोड शोमध्ये सहभागी झालेल्या पाचजणांवर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.










