लाऊडस्पीकरवर अजान दिल्याने इतर धर्मांतील लोकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत नाही, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना व्यक्त केले. तसेच मशिदींना लाऊडस्पीकरवर अजान देण्यास बंदी घालण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. संविधानाच्या कलम 25(1)नुसार सर्व नागरिकांना त्यांचा धर्म स्वीकारण्याचा आणि धर्माचा प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार आहे, असेही न्यायालय म्हणाले.
अजानच्या आवाजाचा इतर धर्मांतील लोकांना त्रास होतो, असा दावा करीत बंगळुरूतील मंजुनाथ एस. हलावर यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने मशिदींवरील लाऊडस्पीकरवर अजान देण्यामुळे इतर धर्मीयांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नसल्याचे मत नोंदवले. तसेच मशिदींना लाऊडस्पीकरशी संबंधित ध्वनिप्रदूषण नियम लागू करण्याचे आणि त्या नियमांचे मशिदींकडून कशाप्रकारे पालन केले जात आहे याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.










