नशिराबाद पोलीस व पत्रकारांच्या कार्याला मानवतेचा सलाम ! ( भरकटलेल्या अनोळखी व्यक्तींना उपचार करून दिला आधार )

0
2

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे 

भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या नशिराबाद येथील झिपरू अण्णा महाराज प्रवेशद्वारा जवळील एका चहाच्या टपरीवर आढळून आलेल्या अनोळखी व मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीला नशिराबाद पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील उपचारासाठी चोपडा येथील मानव सेवा तीर्थ येथे दाखल करण्यात आले. जागरूक नागरिक आणि नशिराबाद पोलिसांनी दाखविलेल्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास झिपरू अण्णा महाराज प्रवेशद्वाराजवळ रुपेश माळी यांच्या चहाच्या टपरीवर एक अनोळखी इसम आला. त्याने रुपेश माळी यांच्याकडे विमलची मागणी केली. मात्र, विमल उपलब्ध नसल्याचे सांगून माळी यांनी, “तुला काही खायचे असेल तर सांग, ते मी देतो,” असे सांगितले. मात्र, संबंधित इसमाने त्यास नकार दिला.

यावेळी पोलीस दक्षता संपादक चंदन पाटील, साईमत प्रतिनिधी, डॉ. दीपक लोखंडे, दीपक बोंडे आणि विशाल पवार हे तेथे उपस्थित होते. त्यांनी त्या अनोळखी इसमाची विचारपूस केली. तो कुठून आला, त्याला कुठे जायचे आहे तसेच त्याचे कपडे कुठे आहेत, याबाबत विचारणा केली असता त्याने दिलेली उत्तरे विसंगत व समाधानकारक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यानंतर डॉ. दीपक लोखंडे आणि चंदन पाटील यांनी या प्रकाराची माहिती नशिराबादच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना दिली. त्यांनी तत्काळ पोलीस पथक घटनास्थळी पाठवून संबंधित इसमाला नशिराबाद पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी त्याची सखोल विचारपूस केली असता त्याचे मानसिक संतुलन ढासळलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीस मानसिक आरोग्यविषयक उपचारांची आवश्यकता असल्याचे पोलिसांना सांगितले.

त्यानंतर नशिराबाद पोलिसांनी त्या अनोळखी इसमाला पुढील उपचारासाठी चोपडा येथील मानव सेवा तीर्थ वेले येथे दाखल केले. मानव सेवा तीर्थ येथील डॉक्टरांनी त्याच्यावर योग्य उपचार करून त्याला लवकरात लवकर बरे करण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच त्याच्या कुटुंबीयांचा शोध लागल्यानंतर त्याला कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सांगण्यात आले.

या संपूर्ण घटनेत सुजाण नागरिक म्हणून चंदन पाटील, डॉ. दीपक लोखंडे तसेच नशिराबाद पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनोळखी व्यक्तीकडे दुर्लक्ष न करता त्याच्या मानसिक व वैद्यकीय स्थितीची दखल घेऊन त्याला योग्य उपचार मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

१७ ऑगस्टलाही घडली होती अशीच घटना

दरम्यान, दि. १७ ऑगस्ट रोजी नशिराबाद परिसरात अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळीही एका अनोळखी इसमाला नशिराबाद पोलिसांनी मानव सेवा तीर्थ येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर तो बरा झाल्यावर त्याने आपले नाव अमरजीत असून आपण बिहार राज्यातील रहिवासी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्याला त्यांच्या स्वाधीन केले.

अनोळखी व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्काचे आवाहन

आपल्या परिसरात मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा अनोळखी व्यक्ती आढळल्यास तिच्याकडे दुर्लक्ष न करता जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा मानव सेवा तीर्थाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

“तुमचा एक मदतीचा हात एखाद्या व्यक्तीला पुन्हा त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवू शकतो,” असा संदेशही या घटनेतून देण्यात आला आहे.

नशिराबाद पोलिसांसह जागरूक नागरिकांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे माणुसकीचा आदर्श निर्माण झाला असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Spread the love