जळगाव : जळगाव-ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. कावड यात्रेत सहभागी असलेल्या १० वर्षीय प्रबल राजू गवळी या चिमुरड्याला किराणा माल घेऊन चोपड्याकडे जाणाऱ्या आयशर वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यातून कावड यात्रा म्हाळसादेवी मंदिराकडे आली होती. यात्रा आटोपून भाविक परतत असताना जळगावहून चोपड्याकडे जाणाऱ्या MH-20-EG-3593 क्रमांकाच्या आयशर वाहनाची प्रबल गवळी याला धडक बसली. धडकेनंतर वाहनाने त्याला काही अंतर ओढत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दुर्घटनेत प्रबलचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच प्रबलचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने अपघातस्थळी दाखल झाले. मुलाच्या मृत्यूमुळे नातेवाईकांचा आक्रोश सुरू झाला. एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
अपघातानंतर संतप्त नातेवाईकांनी रस्ता रोखून धरला. मृतदेह घटनास्थळावरून हलवण्यास त्यांनी विरोध केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाला तातडीने ताब्यात घेऊन कारवाई करावी, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी मागणी नातेवाईकांनी केली.
परिस्थिती अधिक चिघळल्यानंतर संतप्त जमावाने किराणा मालाने भरलेल्या आयशर वाहनाला आग लावल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. जमावाची पांगापांग करत असताना तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्याशी धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सायंकाळी सुमारे ५ वाजल्यापासून साडेसहा वाजेपर्यंत रस्ता पूर्णपणे ठप्प होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अपघातस्थळी पोलीस अधीक्षकांसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.
दरम्यान, अपघातातील आयशर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. घटनेमुळे ममुराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या हृदयद्रावक अपघातामुळे कावड यात्रेतील आनंदाचे वातावरण क्षणार्धात शोकाकुल झाले.












