समृद्धी महामार्गावर 1 जुलैला रात्री नागपूरहून पुण्याकडे निघालेली खासगी लक्झरी बस ही दुभाजकाला धडकली व बसने पेट घेतला. या दुर्घटनेत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता या अपघाताबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती आणि त्यात नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी होते. पिंपळखुटा गावालगत आली असता बस दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. बस पलटी झाल्याने बसचा दरवाजा हा खालच्या बाजूला आला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. काही प्रवाशांनी बसच्या काचा फोडून आपला जीव वाचवला. बाकीचे 25 जण मात्र दुर्दैवी ठरले. त्यांचा अक्षरशः कोळसा झाला. या भीषण अपघाताने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला होता.
या अपघाताच्या चौकशीदरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बसचा चालक शेख दानिश हा बस चालवताना मद्यधुंद अवस्थेत होता. दानिशच्या रक्ताच 30 टक्के अल्कोहोल आढळून आले आहे. दानिश हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
90 दिवसांत 40 अपघात
नागपूर ते शिर्डी या 520 किमी टप्प्याचे 11 डिसेंबर 2022 रोजी उद्घाटन झाले. त्यानंतर 11 डिसेंबर ते 11 मार्च या 90 दिवसांत समृद्धी महामार्गावर तब्बल 40 अपघात झाले. पहिल्या 40 दिवसांतच 20 अपघात झाले. समृद्धी महामार्ग हा जणू मृत्यूचा सापळाच बनत चालला आहे.











