महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा (ATMA) योजनेअंतर्गत सन २०२५–२०२६ या आर्थिक वर्षासाठी “मशरूम शेती शाळा” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा मा. श्री.दीपक पटेल साहेब व तळोदा तालुका कृषी अधिकारी श्रीमती.मीनाक्षी वळवी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये कालो कुणबी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तसेच अनुभवी मशरूम शेती मार्गदर्शक श्री.राजेंद्र वसावे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मशरूम शेतीचे तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, उत्पादन वाढीचे उपाय, खर्च व नफा गणित, बाजारपेठ व्यवस्थापन आदी विषयांवर सखोल व मार्गदर्शक माहिती दिली. मशरूम शेती ही कमी भांडवलात, कमी जागेत व कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारी शेती पद्धत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. या शेती शाळेमध्ये मशरूम शेतीसाठी लागणारे आवश्यक साहित्य, कच्चा माल, प्रक्रिया पद्धती तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष करून शिकण्यावर भर देण्यात आला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम पहिल्या आठवड्यापासून सुरू होऊन एकूण चार आठवड्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम मोड पुनर्वसन गावात शेतकरी वंताबाई रमेश वसावे यांच्या घरी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मा. मंडळ कृषी अधिकारी श्री. बी. एन. माळी साहेब, उप कृषी अधिकारी श्री.एस.डी.दाणी साहेब, सहायक कृषी अधिकारी श्रीमती ज्योती गावित मॅडम तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) श्री.विपुल चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मशरूम शेतीकडे पूरक व्यवसाय म्हणून पाहण्याचे आवाहन केले.
या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांना नवे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार असून, शेतीला जोडधंद्याच्या माध्यमातून उत्पन्नवाढ साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शेतीतील नवकल्पना, आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विभाग व आत्मा योजनेचे आभार मानले असून, पुढील काळातही असे प्रशिक्षण उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.










