निव्वळ ‘ अस्पृश्य ‘ म्हणून प्रधानमंत्री होऊ न शकलेले जगजीवन राम 

0
3

जगजीवन राम अर्थात बाबूजी हे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षांपासून राजकीय चळवळीत सक्रिय सहभागी राहिलेले नेते होते . शिक्षण घेत असतानाच ते १९३१ ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे अधिकृत सभासद झाले . अस्पृश्य समाजाच्या प्रगतीसाठी मे १९३५ ला ते व चंद्रिका राम हे कानपूर येथे ‘ ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास लीग ‘ या संघटनेची स्थापना करतात . जगजीवन राम हे या संघटनेचे संस्थापक सचिव होतात . त्यांचे कार्य व अभ्यास लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांची बिहार विधान परिषदेचे सदस्य म्हणून १९३६ मध्ये नियुक्ती करतात .

१९३७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बाबू जगजीवनराम यांनी त्यांच्या लीग तर्फे काही उमेदवार उभे केले . त्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बरेच यश मिळाले , ते स्वतः बिनविरोध निवडून आले. या वेळेस त्यांचे वय अवघे २९ वर्षे होते . १९४६ मध्ये ते संविधान सभेवर निवडून आले तसेच पंडित नेहरू यांच्या हंगामी मंत्रिमंडळात कामगार मंत्री झाले . सर्वात कमी वयाचे मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख आहे . पुढं काँग्रेस मंत्रिमंडळात ते कृषी , संरक्षण , रेल्वे , दूरसंचार , दळणवळण सारख्या महत्त्वपूर्ण खात्याचे कॅबिनेट मंत्री राहिले .

ते संरक्षण मंत्री असताना भारत – पाकिस्तान युद्ध झाले . भारताला युद्धात यश मिळाले, पाकिस्तानचे विभाजन होऊन स्वतंत्र बांगला देश निर्माण झाला . बांगला देशाच्या सरकारने जगजीवन राम यांचा या कार्यामुळे मोठा सत्कार केला होता . प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता . प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात १९७५ ला आणीबाणी लागू केली तेंव्हा या संबंधीचा ठराव लोकसभेत त्यांनी राम यांनाच मांडायला लावला होता .

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावल्यामुळे सर्व विरोधी पक्ष काँग्रेस विरुद्ध जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले . काँग्रेस विरुद्ध इतर सर्व असे देशात चित्र होते . असे असले तरी १९७७ ला जेंव्हा लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेंव्हा काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असे देशात चित्र होते. बहुतांश प्रमुख विरोधी नेते जेल मध्ये होते . निवडणुकीला फक्त ६० दिवसांचा अवधी होता . या दरम्यान जगजीवन राम हे काँग्रेस पक्षातून बाहेर पडतात , स्वतःचा वेगळा पक्ष काढतात व जनता पक्षासोबत युती करतात .

राम यांनी २ फेब्रुवारी १९७७ ला काँग्रेस पक्ष सोडला आणि देशाचे राजकीय चित्र बदलून गेले . विरोधी पक्ष अधिक सक्रिय झाला . जयप्रकाश नारायण यांनी ” १९७७ मध्ये जर जनता पक्ष सत्तेवर आला तर जगजीवन राम हे प्रधानमंत्री होतील ” असे जाहीर केले . जनता पक्षातील सर्व घटक पक्षांनी त्यास संमती दिली . सर्व विरोधी पक्ष निवडणुकीला सामोरे गेले . जनता पक्षाचे एकूण २९८ खासदार निवडून आले . आता ठरल्या प्रमाणे जगजीवन राम यांना प्रधानमंत्री करणे आवश्यक होते , मात्र मोरारजी देसाई , चौधरी चरणसिंग हे सुद्धा या पदाच्या शर्यतीत उतरले . विविध प्रकारच्या राजकीय खेळ्या खेळत खेळत चरणसिंग यांनी राज नारायण यांच्या करवी मोरारजी देसाई यांना प्रधानमंत्री करावे असा संदेश जयप्रकाश नारायण यांना दिला व जयप्रकाश नारायण यांनी निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनाला बाजूला ठेऊन मोरारजी देसाई यांना प्रधानमंत्री करण्याचे जाहीर केले . जगजीवन राम यांना उपप्रधानमंत्री केले गेले .

केवळ अस्पृश्य असल्याने मार्च १९७७ ला प्रधानमंत्री होऊ न शकलेले जगजीवन राम १९६६ ला सुद्धा अस्पृश्य असल्याने प्रधानमंत्री होऊ शकले नाही. ११ जानेवारी १९६६ मध्ये प्रधानमंत्री लाल बहाद्दूर शास्त्री यांचे अकस्मात निधन झाले असता पुढील प्रधानमंत्री कोण ? या संदर्भाने काँग्रेस संसदीय मंडळात निवडणूक घेण्यात आली तेंव्हा इंदिरा गांधी , जगजीवन राम , मोरारजी देसाई यांचेत निवडणूक झाली .जगजीवन राम निवडून येणार असे चित्र होते . कामराज , स. का. पाटील , अतुल्य घोष व काही मंडळी हे इंदिरा गांधी यांचे कट्टर विरोधक व मोरारजी देसाई यांचे विशेष सहकारी होते . मोरारजी देसाई यांच्या बाजूने खूपच कमी सभासद असल्याने ते निवडून येणार नव्हतेच पण , जगजीवन राम हे प्रधानमंत्री होउ नये म्हणून कामराज , पाटील , घोष ही मंडळी इंदिरा गांधी यांना मत देतात . त्यांच्या या खेळीमुळे जगजीवन राम १९६६ मध्ये प्रधानमंत्री होऊ शकले नाही .

मार्च १९७७ मध्ये चरणसिंग यांच्या मुख्य खेळी मुळे जगजीवन राम ऐवजी मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले पण , ११ जुलै १९७७ ला यशवंतराव चव्हाण हे देसाई सरकार विरुद्ध लोकसभेत अविश्वासाचा ठराव आणतात तेंव्हा चरणसिंग त्यांच्या ६४ सभासदांना घेऊन जनता पक्षातून वेगळे होतात , त्यांना इंदिरा काँग्रेस बाहेरून पाठिंबा जाहीर करतात . या घटनेमुळे मोरारजी देसाई प्रधानमंत्री पदाचा १५ जुलै रोजी राजीनामा देतात . देसाई यांनी प्रधानमंत्री पदाचा राजीनामा जरी दिला असला तरी जनता पक्षाच्या नेतेपदी मीच असल्याने मला प्रधानमंत्री करावे असे एक वेगळे पत्र ते राष्ट्रपतींना देतात , या प्रसंगी जनता पक्षाचे अध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर यांनाही आपण प्रधानमंत्री व्हावे असे वाटते देसाई – चंद्रशेखर यांच्या खेळीत जगजीवन राम यांना पुन्हा ते अस्पृश्य असल्याने प्रधानमंत्री पदाकरिता डावलले जाते . व दिनांक २८ जुलै १९७९ रोजी चरणसिंग प्रधानमंत्री होतात . चरणसिंग प्रधानमंत्री झाल्यानंतर देसाई नेतेपदाचा राजीनामा देतात .( जगजीवन राम यांची नेतेपदी निवड होईल हे त्यांना माहीत असल्याने त्यांनी ही खेळी खेळली असावी )

पुढं चरणसिंग यांना बाहेरून दिलेला पाठिंबा इंदिरा गांधी यांची काँग्रेस काढून घेते , त्यामुळे चरणसिंग २८ ऑगस्ट १९७९ ला लोकसभा विसर्जित करून नव्याने निवडणुका घेण्याची शिफारस करून प्रधानमंत्री पदाचा राजीनामा देतात . ( इंदिरा गांधी यांनी पाठिंबा काढल्या नंतर चरणसिंग जगजीवन राम यांना पाठिंबा देऊ शकत होते , मात्र जगजीवन राम यांना ती संधी मिळूनये म्हणून ते लोकसभा विसर्जनाची खेळी खेळतात . ) या प्रसंगी पुन्हा जनता पक्ष जगजीवन राम यांना प्रधानमंत्री करण्या विषयी हालचाली करतात , राम हे जनता पक्षाचे नेते असतात . जनता पक्षाचे तेंव्हा २३४ सभासद असतात . द्रमुकचे १८ सभासद त्यांना पाठिंबा देतात . पाठींबा देण्याचे सत्र सुरूच असते . २२ ऑगस्ट १९७९ ला राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी जगजीवन राम व चंद्रशेखर यांना चर्चे करिता बोलावतात . हे दोघं नेते दुपारी राष्ट्रपती भवनातून बाहेर येतात तेंव्हा जगजीवन राम प्रधानमंत्री होणार हे जवळ जवळ निश्चित झाले होते . त्याच अनुषंगाने सारे काही घडत होते , मात्र संध्याकाळी राष्ट्रपती रेड्डी यांनी लोकसभा विसर्जित करून मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या . रेड्डी यांच्या निर्णयाचे इंदिरा गांधीसह सर्वांनाच नवल वाटले . इथेही त्यांची जात आडवी आली आणि राम प्रधानमंत्री पदास मुकले.

स्वतःला समाजवादी , साम्यवादी , पुरोगामी , इंदिरा गांधी यांचे कट्टर विरोधक म्हणविणारे , काँग्रेस हटावचे नारे देणारे अनेक तथाकथित नेते किती जातीयवादी व काँग्रेस भक्त होते हे या प्रकरणातून दिसून येते.

जवळ जवळ ५० वर्षे भारतीय राजकारणात अग्रेसर राहिलेल्या जगजीवन राम यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

जयसिंग वाघ

अजिंठा हाउसिंग सोसायटी, अजिंठा चौक, जळगाव

संपर्क .. ९८८१९२८८८१

Spread the love