खेलो मास्टर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी; संजय मोती यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

0
2

जळगाव (प्रतिनिधी) – क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि समर्पणाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करणारे जळगावचे धावपटू संजय मोती यांना खेलो मास्टर स्पर्धेमध्ये सन २०२४ ते २०२५ या कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.

जळगाव रनर्स ग्रुपतर्फे आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात महापौर दीपमाला ताई काळे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या हस्ते संजय मोती यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संजय मोती यांनी राज्यस्तरीय अॅथलेटिक्स मास्टर स्पर्धांमध्ये जळगावचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि क्रीडाप्रेमामुळे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाची दखल घेत जळगाव रनर्स ग्रुपने त्यांचा विशेष गौरव केला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. अशा सन्मानामुळे नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळून तेही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी जळगाव रनर्स ग्रुपचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी नागरिक तसेच अनेक धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय मोती यांच्या सन्मानामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.

संजय मोती यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Spread the love