नवोदित कलाकारांसाठी सुवर्णसंधी; ‘खाटू श्याम बाबांची कृपा’ शॉर्टफिल्मसाठी 30 जुलै रोजी ऑडिशन

0
2

जळगाव | प्रतिनिधी

भारतीय संस्कृतीत श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशाच भक्तीभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने MM MUSIC00 प्रस्तुत “खाटू श्याम बाबांची कृपा” या भक्तिमय व प्रेरणादायी शॉर्टफिल्मची निर्मिती करण्यात येत आहे. या शॉर्टफिल्मसाठी विविध भूमिकांमध्ये काम करण्यासाठी नवोदित कलाकारांची निवड केली जाणार असून दि. 30 जुलै 2026 (गुरुवार) रोजी सकाळी 10.00 वाजता ऑडिशनचे आयोजन करण्यात आले आहे

खाटू श्याम बाबा हे महाभारतातील पराक्रमी योद्धा बर्बरीक यांचे कलियुगातील पूजनीय स्वरूप मानले जाते. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना कलियुगात “श्याम” या नावाने पूजले जाईल आणि जो भक्त श्रद्धा, विश्वास व निःस्वार्थ भावनेने त्यांचे स्मरण करेल, त्याच्या मनोकामना पूर्ण होतील, असा आशीर्वाद दिल्याची श्रद्धा आहे. देशभरातील लाखो भाविक राजस्थानमधील खाटू श्याम मंदिरात दर्शनासाठी जातात. संकटसमयी धैर्य, आशा आणि भक्तीचा मार्ग दाखविणारे देव म्हणून खाटू श्याम बाबांवर लाखो भक्तांची अढळ श्रद्धा आहे.

याच श्रद्धेला आणि सकारात्मक विचारांना केंद्रस्थानी ठेवून तयार होत असलेली “खाटू श्याम बाबांची कृपा” ही शॉर्टफिल्म एका सामान्य माणसाच्या संघर्ष, विश्वास आणि भक्तीमुळे घडणाऱ्या जीवनातील सकारात्मक परिवर्तनाची कथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. समाजात श्रद्धा, कुटुंबातील नाती आणि चांगल्या विचारांचा संदेश देण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न आहे.

या शॉर्टफिल्मसाठी मुख्य नायक, मुख्य नायिका, आई, वडील, मित्र, सावकार, डॉक्टर, व्यावसायिक, मंदिराचे पुजारी, भजन मंडळातील कलाकार, महिला व पुरुष सहाय्यक कलाकार तसेच बालकलाकार अशा विविध भूमिकांसाठी कलाकारांची निवड केली जाणार आहे. अभिनयाची आवड असलेल्या सर्व वयोगटातील नवोदित कलाकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

डिशनचे ठिकाण वृंदावन हाऊस, ममुराबाद, विदगाव रोड, ता. जळगाव (जळगाव संदेश कार्यालयाजवळ) असे असून इच्छुकांनी 2 पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्राची प्रत आणि अभिनयाचा छोटा परिचय (असल्यास) सोबत आणावा.

अधिक माहितीसाठी 9923310204, 9421641161 किंवा 7385418768 या क्रमांकांवर संपर्क साधावा. निर्माते महेंद्र सोनवणे (MM MUSIC00) यांनी जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या अभिनयाची चमक दाखवावी, असे आवाहन केले आहे.

Spread the love