जळगाव | प्रतिनिधी : शेतीच्या मोजणीचे काम करून देण्यासाठी तब्बल ₹७१,७०० लाचेची मागणी करणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी यशस्वी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ४४ वर्षीय शेतकरी असून त्यांच्या गावातील गट क्रमांक ५६ मधील शेतीची मोजणी व वाटणी करण्यासाठी त्यांनी उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव येथे अर्ज केला होता. मात्र, हे काम करून देण्यासाठी उपअधीक्षक राहुल ताराचंद कोळी (वय ३२) यांनी सुरुवातीला ₹७० हजार लाचेची मागणी केली. या व्यवहारात डेटा एंट्री ऑपरेटर कल्पेश सोमनाथ पाटील (वय ३२) याचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले.
याबाबत तक्रारदाराने १७ जुलै २०२६ रोजी एसीबी, जळगाव येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने केलेल्या पडताळणीत आरोपींनी मोजणीची नोटीस पाठविण्यासाठी स्टॅम्प खर्चाच्या नावाखाली ₹६२५, तसेच कार्यालयीन खर्च, नोटीस व इतर कारणे सांगत अतिरिक्त रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर २९ जुलै २०२६ रोजी एसीबीने सापळा रचला. शेती मोजणीसाठी एकूण ₹७१,७०० लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी आरोपींनी दर्शविल्यानंतर जळगाव तालुक्यातील बसस्थानक परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी उपअधीक्षक राहुल कोळी याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात डेटा एंट्री ऑपरेटर कल्पेश पाटील याचाही सहभाग आढळून आला आहे.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ व ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस कर्मचारी संगीता पवार, प्रदीप पोठे, भूषण पाटील आणि मनोज पाटील यांनी सापळा यशस्वी केला. वरिष्ठ स्तरावर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेहेंदळे आणि कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.
जळगाव संदेश मत
शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या कार्यालयात साध्या कामांसाठीही लाचेची मागणी होत असल्याच्या घटना चिंताजनक आहेत. शासनाकडून चांगला पगार मिळूनही काही अधिकारी व कर्मचारी नागरिकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचे अशा कारवायांतून समोर येत आहे. जिल्ह्यात लाच मागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची भावना नागरिकांमध्ये असून, अशा भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून पारदर्शक प्रशासनाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.












