दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची चाकूने हत्या; भडगाव तालुक्यात खळबळ

0
2

भडगाव (प्रतिनिधी): भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्यावर धारदार चाकूने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. …) सकाळी सुमारे 8.30 वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले आहे.

मृत महिलेचे नाव ललिता आत्माराम राठोड (वय 36) असे असून आरोपीचे नाव आत्माराम पतीलाल राठोड (वय 40, रा. वसंतवाडी तांडा) असे आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आत्माराम राठोड याने दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. मात्र पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने घरातील धारदार चाकूने पत्नीच्या पोटावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या ललिता राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे पाठविण्यात आला.

या प्रकरणी मयत महिलेचे भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात आरोपी आत्माराम राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार या पुढील तपास करत आहेत.

– जळगाव संदेश

Spread the love