इच्छादेवी चौकात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी

0
2

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील इच्छादेवी चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी सुमारे साडेसहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एमएच 19 बीएल 7077) दुचाकी (एमएच 19 ईसी 9084) ला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात लीलाधर मंगल पाटील (वय 36, रा. कठोरा, ता. जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, धडक इतकी भीषण होती की कारने सलग दोन वेळा पलटी घेतली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली.

मृत लीलाधर पाटील हे मूळचे कठोरा येथील असून सध्या जळगाव शहरातील चंदू अण्णानगर येथे वास्तव्यास होते. ते नेहमीप्रमाणे एमआयडीसीतील निर्मल पाईप कंपनीत कामावर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. मात्र, इच्छादेवी चौकात झालेल्या या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

या प्रकरणी वृत्त लिहिपर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Spread the love