जळगाव तालुक्यातील देऊळवाडा परिसरातील घटना; तिघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव : प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणावरून वारंवार धमकावून मानसिक त्रास दिल्याच्या आरोपातून एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील देऊळवाडा परिसरात घडली. प्रशांत संजय सोनवणे (वय २८, रा. देऊळवाडा, ता. जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सोनवणे याची मावस बहीण रोशनी अशोक ठाकरे हिचे संदीप महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संबंधाला प्रशांतचा विरोध असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याच कारणावरून संदीप महाजन, विशाल महाजन तसेच त्यांच्या आईकडून प्रशांतला वारंवार अडवून धमकावले जात होते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच रस्त्यात अडवून आणि विविध ठिकाणी त्याला त्रास दिला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सततच्या त्रासामुळे प्रशांत मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता आणि अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आसोदा उड्डाणपुलाजवळील गवळी मुंजोबा मंदिराच्या मागील शेताच्या बांधावर प्रशांतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
घटनेनंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, आत्महत्येमागील नेमके कारण तसेच संबंधित आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे. जळगाव तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.










