ममुराबादमध्ये ई-पीक पाहणीचा खोळंबा; शेतकरी हैराण

0
3

दोनच तरुणांवर मोठ्या शेती क्षेत्राची जबाबदारी; पंचनाम्यांसाठीही मनुष्यबळाची कमतरता — शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती

ममुराबाद, ता. जळगाव :

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे ई-पीक पाहणीची नोंद करण्यात होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ममुराबाद गावाचा शेती परिसर मोठ्या प्रमाणात असल्याने ई-पीक पाहणी करण्यासाठी दोन तरुणांकडे लॉगिन आयडीची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र शेतकरी आणि संबंधित तरुण यांच्या वेळेचा मेळ बसत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ई-पीक पाहणीची नोंद वेळेत होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ई-पीक पाहणीची नोंद वेळेत न झाल्यास भविष्यात शासनाच्या विविध योजना, नुकसानभरपाई अथवा पीकविमा यांसारख्या बाबींमध्ये शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ‘आज वेळ मिळाला नाही, उद्या पाहू’ अशा पद्धतीने ई-पीक पाहणीचे काम चालणार का? असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

पंचनाम्यांची जबाबदारीही मोजक्याच अधिकाऱ्यांवर

दरम्यान, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांचे नियमित शासकीय काम सांभाळून पंचनामे करण्याची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

शासनाने पंचनाम्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली असेल, तर प्रत्यक्ष शेतात जाऊन प्रत्येक नुकसानीचा पंचनामा करण्याऐवजी कार्यालयात बसून सरसकट पंचनामे करण्याचा पर्याय स्वीकारला जात आहे का? असा सवालही शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

ई-पीक पाहणीसाठी अधिक मनुष्यबळाची गरज

ममुराबादचा मोठा शेती परिसर लक्षात घेता केवळ दोन व्यक्तींवर ई-पीक पाहणीची जबाबदारी सोपवणे पुरेसे आहे का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. ई-पीक पाहणीची नोंद करण्यासाठी दोनपेक्षा अधिक व्यक्तींची नियुक्ती करून स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ई-पीक पाहणीच्या नोंदीमध्ये झालेला विलंब किंवा एखाद्या शेतकऱ्याची ई-पीक पाहणी राहून गेल्यास त्याचे भविष्यात आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री व्यवस्था न करता प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी करणे गरजेचे आहे.

तहसीलदारांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी

ई-पीक पाहणी, पंचनामे आणि संबंधित शासकीय नोंदी या बाबी शेतकऱ्यांच्या भविष्यातील नुकसानभरपाई व शासकीय लाभांशी संबंधित असल्याने या प्रकरणाकडे तहसीलदारांनी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी ममुराबाद परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

नेमून दिलेले अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्षात व्यवस्थित काम करीत आहेत का, किती शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे, किती शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी अद्याप बाकी आहे आणि पंचनाम्यांची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे, याची प्रशासनाने तातडीने तपासणी करावी.

एकाही शेतकऱ्याची ई-पीक पाहणी केवळ यंत्रणेतील विलंबामुळे राहून जाऊ नये आणि कोणताही शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहू नये, यासाठी ममुराबादमध्ये तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन ई-पीक पाहणी व पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी शेतकरी करीत आहेत.

Spread the love