प्रतिनिधी | ममुराबाद, ता. जि. जळगाव
मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथील वार्ड क्रमांक ६ मधील भिल्लवाडीवर महापुराचे मोठे संकट कोसळले असून, ३८ कुटुंबांतील तब्बल १४८ नागरिकांचे संसार अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहेत. घरांमध्ये अचानक शिरलेल्या पाण्यामुळे अन्नधान्य, कपडे, भांडी, घरगुती साहित्य तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबे बेघर झाली असून परिसरात भीती व हळहळीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जळगावहून येणाऱ्या लेंडी नाल्याचे पाणी, गावातील साचलेले पावसाचे पाणी तसेच नुकत्याच झालेल्या जळगाव–किंगाव रस्त्यालगतच्या गटारीचा योग्य निचरा न झाल्यामुळे सर्व पाणी एकाच वेळी लेंडी नाल्यात मिसळले. त्यामुळे नाल्याला मोठा पूर आला आणि पाण्याचे प्रचंड लोट थेट भिल्लवाडीत घुसले. काही क्षणांतच संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली.
पूराचे पाणी इतक्या वेगाने वाढले की, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसह अनेक कुटुंबांना घराबाहेर पडणेही अशक्य झाले. परिस्थिती गंभीर होताच ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
यावेळी सरपंच हेमंत चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी विजय महाजन, उपसरपंच विलास सोनवणे, सदस्य अमर पाटील, गोपाल मोरे, तलाठी निकिता पष्ठे, प्राथमिक उपकेंद्राचे कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी धाव घेत सर्व पूरग्रस्तांना सुरक्षितपणे मराठी शाळेतील अंगणवाडीत स्थलांतरित केले. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच मराठी शाळेतील पोषण आहार बनविणाऱ्या महिलांनी पुढाकार घेत सर्व पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली.
प्राथमिक पंचनाम्यानुसार प्रकाश ताशीरसिंग माळी, गणेश ताशीरसिंग माळी, महेंद्र ताशीरसिंग माळी, राजधर चुडामण माळी, संगीता शरद वाघ, किरण नथ्थूजी वाघ, पिंटू नथ्थूजी वाघ, कमलाकर अशोक माळी, अशोक चुडामण माळी, जसुबाई नथ्थूजी वाघ, सुकलाल बिसण वाघ, भारती महेंद्र वाघ, अविनाश शुकलाल वाघ, मिराबाई विलास भील, रेखा नागेश्वर माळी, इमरान नागेश्वर माळी, मोना नागेश्वर माळी, विलास राजू वाघ, मंदा अनिल भील, शारदा करण भील, हिराबाई धनराज भील, श्वेताबाई अभिमन्यू वाघ, दशरथ रामदास मिस्तरी, अनुसया सोमा वाघ, दीपक श्याम वाघ, श्याम सीमा वाघ, जनाबाई शंकर पवार, लक्ष्मी कालुसिंग माळी, चंदू सुकलाल सोनवणे, सुरेखा सुकलाल सोनवणे, हिराबाई शांतिलाल सोनवणे, मच्छिंद्रनाथ सुकलाल सोनवणे, बाबू मंग्या ठाकरे, मंगला भगवान वाघ, मिना अशोक वाघ, रमाबाई हिरालाल भील, अभिमन्यू भील आणि लक्ष्मण छंगालाल भील या कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या ३८ कुटुंबांतील एकूण १४८ सदस्य या आपत्तीमुळे बाधित झाले आहेत.
दरम्यान, पूरग्रस्तांनी प्रशासनाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करावेत, नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत व शासकीय भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
तसेच भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी लेंडी नाल्याची तातडीने साफसफाई, जळगाव–किंगाव रस्त्यालगतच्या गटारांचा योग्य निचरा आणि कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा प्रत्येक पावसाळ्यात भिल्लवाडीतील नागरिकांना अशाच संकटाचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.












