कारागृहात आखला दरोड्याचा कट; २०२३ मधील जळगावच्या ३ कोटी १७ लाखांच्या दरोडा प्रकरणातील आरोपीचा सहभाग
जळगाव : एखाद्या गुन्हेगारी चित्रपटाला शोभेल असा थरारक घटनाक्रम भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियावरील दरोड्याच्या तपासातून समोर येत आहे. या दरोड्याच्या कटामागे बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक याचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कारागृहात असतानाच या दरोड्याचा कट आखण्यात आल्याचे तपासातून उघड होत असल्याने पोलीस यंत्रणेसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगावच्या तीन कोटींच्या दरोडा प्रकरणातील आरोपीचा सहभाग
शंकर जासक याच्यावर २०२३ मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ३ कोटी १७ लाख रुपयांचा दरोडा टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कारागृहात असताना त्याची ओळख गजानन राजेंद्र पवार याच्याशी झाली होती. गजानन पवार हा २०२४ मधील खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. काही महिन्यांपूर्वी दोघांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आणखी दोन साथीदारांना सोबत घेत भोकर येथील बँक लुटण्याचा कट रचल्याची माहिती तपासात समोर येत आहे.
छऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखवून १६ लॉकर उघडले
पूर्वनियोजित कटानुसार चारही संशयित भोकर येथील बँकेत दाखल झाले. छऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकासह कॅशियरला धमकावले. कर्मचाऱ्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून तब्बल १६ लॉकर उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर लॉकरमधील सोने आणि रोकड पाच ते सहा बॅगांमध्ये भरून संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. विशेष म्हणजे, तब्बल ४० ते ४५ मिनिटे संशयित बँकेच्या आत असल्याची माहिती आहे.
ग्रामस्थांचा पाठलाग; चावलखेडा परिसरात पोलिसांची कारवाई
दरोडा टाकल्यानंतर आरोपी धरणगावच्या दिशेने पसार होत असताना ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. या दरम्यान चावलखेड्याजवळ काही बॅगा फेकून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवली. चावलखेडा परिसरातील शेतात सापळा रचून पोलिसांनी शंकर जासक आणि गजानन पवार यांच्यासह एकूण चार संशयितांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
रोकड आणि सोन्याच्या बॅगा जप्त
या कारवाईत संशयितांकडून सुमारे १५ लाख रुपयांची रोकड तसेच सोन्याने भरलेल्या बॅगा जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. बँकेतून नेण्यात आलेल्या एकूण ऐवजाचा तपशील, जप्त मुद्देमालाचे मूल्य आणि या गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
कारागृहात झालेली ओळख, त्यानंतर आखण्यात आलेला दरोड्याचा कट आणि बँकेत प्रत्यक्ष दरोडा टाकण्यापर्यंतचा घटनाक्रम पाहता या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच मोठ्या दरोडा प्रकरणात आरोपी असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याचे नाव पुन्हा अशा गुन्ह्यात समोर आल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.












