मंत्री अतुल सावे कुटुंबाचा संवेदनशील निर्णय; २५ नोव्हेंबरचा विवाह सोहळा होणार साधेपणाने
छत्रपती संभाजीनगर :
राज्यात दुष्काळाचे सावट आणि शेतकरी बांधव आर्थिक संकटाचा सामना करत असताना, मंत्री अतुल सावे यांच्या कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. मुलगा उद्योजक अनुराग याच्या विवाहासाठी नियोजित असलेला शाही सोहळा रद्द करून विवाह साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय दोन्ही परिवारांनी घेतला आहे.
विशेष म्हणजे, विवाह सोहळ्यावरील खर्च टाळून उद्योगातील निधीची भर घालत तब्बल १ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी समर्पित करण्याचा निर्णय सावे-मुळे परिवाराने घेतला आहे.
मंत्री अतुल सावे यांचे धाकटे चिरंजीव अनुराग यांचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिष्ठित उद्योजक अजित मुळे यांची कन्या ईशा यांच्याशी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याचे नियोजन होते. मात्र, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील शेतकरी बांधव दुष्काळ आणि शेतीच्या नुकसानीमुळे संकटात असताना मोठा शाही सोहळा करणे योग्य वाटत नसल्याने दोन्ही कुटुंबांनी साधेपणाचा निर्णय घेतला.
स्व. मोरेश्वर सावे साहेबांपासून सावे परिवार सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला आहे. त्याच सामाजिक बांधिलकीतून शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी हा निधी समर्पित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना आपलाही हातभार लागावा, या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे.
विवाहातील दिखाव्यापेक्षा संकटातील शेतकऱ्यांना मदतीला प्राधान्य देणारा हा निर्णय निश्चितच समाजासमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवणारा आहे. अनुराग आणि ईशा यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने होणार आहे.












