कुलभूषण पाटील आणि प्रभाकर सोनवणे यांची माघार; जळगाव सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट

0
2

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. जळगाव सोसायटी मतदारसंघातून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील आणि भाजपचे प्रभाकर गोटू सोनवणे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गुलाबराव पाटील यांचा जिल्हा बँकेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरुवातीपासूनच राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची मानली जात होती. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकारी निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यामुळे अर्ज माघारीच्या अंतिम दिवसाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

जळगाव सोसायटी मतदारसंघात गुलाबराव पाटील यांच्यासमोर कुलभूषण पाटील आणि प्रभाकर गोटू सोनवणे यांचे आव्हान होते. मात्र, दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली आहे. परिणामी गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

सहकार क्षेत्रात गुलाबरावांची नवी राजकीय खेळी!

राज्य मंत्रिमंडळात पाणीपुरवठा मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी आता सहकार क्षेत्रातही आपले स्थान निर्माण केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात त्यांचा प्रवेश ही राजकीय वर्तुळातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

दरम्यान, कुलभूषण पाटील आणि प्रभाकर सोनवणे यांनी ऐनवेळी माघार का घेतली, याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. या माघारीमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. मात्र, अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी झालेल्या या घडामोडीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकीय समीकरण बदलले असून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात गुलाबराव पाटील यांच्या नव्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love