येत्या मंगळवार, 8 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. महाराष्ट्रातून खंडग्रास स्थितीत चंद्र उगवताना दिसणार आहे. या वर्षातील हे अखेरचे चंद्रग्रहण आहे.
चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथून दिसणार आहे. चंद्रग्रहणास मंगळवारी दुपारी 2.39 मिनिटांनी प्रारंभ होईल. दुपारी 3.47 ते 5.12 संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थिती होईल. सायंकाळी 6.19 वाजता चंद्रग्रहण सुटेल. जेथे दृश्य आकाशात चंद्रबिंब असेल तेथे चंद्रग्रहण दिसेल. हिंदुस्थानच्या पूर्व भागात खग्रास स्थितीतच चंद्र उगवताना दिसणार आहे. कोलकाता येथे खग्रास स्थितीमध्येच सायंकाळी 4.52 वाजता ‘ब्लड मून’-चंद्र उगवताना दिसेल. छायाचित्रकारांना ती एक पर्वणी असेल. उर्वरित हिंदुस्थानात खंडग्रास स्थितीतच चंद्र उगवताना दिसेल. चंद्रग्रहण सायंकाळी 6.19 वाजता सुटेल, अशी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.











