राज्यातील कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यांनी केलेली ही शिवीगाळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रुचलेली नाही. राज्यात ठिकठिकाणी सत्तार यांचा निषेध करण्यात येत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. सत्तार यांचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा तौर यांनी एक घोषणा केली आहे. सत्तार हे महाराष्ट्रात जिथं कुठं दौऱ्यावर असतील तिथे त्यांचे कपडे फाडावेत. त्यांचे कपडे फाडणाऱ्याला मी स्वतः 10 लाख रुपयांचं बक्षीस देईन, असे तौर यांनी म्हटले आहे. रेखा तौर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटीत कामगार विभाग प्रदेशच्या उपाध्यक्षा आहेत.
सत्तार अज्ञातवासाच्या बुरख्यात, राष्ट्रवादीचे राज्यभरात आंदोलन सुरूच
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून समस्त महिलावर्गाचा अवमान करणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे बेपत्ता झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सत्तार यांना जंग जंग पछाडत आहेत. पण सोमवार सायंकाळपासून सत्तार यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ आहे. आजचा नियोजित बुलढाणा दौराही त्यांनी रद्द केला. संभाजीनगर जिह्यातील सिल्लोड येथील आपल्या घरीही ते नसल्याचे सांगण्यात येते. किमान आठवडाभर तरी बाहेर पडू नका असे त्यांना मुख्यमंत्र्यांनीच बजावले असल्याने सत्तार हे अज्ञातवासाच्या बुरख्यात गेलेत की काय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नियोजित दौरा अचानक रद्द
सत्तार मंगळवारी बुलढाणा जिह्याच्या दौऱ्यावर होते; पण वातावरण तापल्याने त्यांनी तो दौरा अचानक रद्द केला. तेथील सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन ते घेणार होते. त्यानंतर चांगेफळ येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात सहभागी होणार होते. जिह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिला होता. त्यामुळे दौरा रद्द करून ते भूमिगत झाले आहेत.
सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे गंभीर पडसाद राज्यभरात उमटले. मुंबई, ठाणे, संभाजीनगर आदी भागांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलने केली. सत्तार यांच्या मुंबई आणि संभाजीनगरमधील निवासस्थानावर दगडफेक करण्यात आली. सत्तारांच्या पुतळय़ाची अंत्ययात्रा काढून त्याचे दहन करण्यात आले. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागितला.
सत्तार यांच्यामुळे सरकारवर टीका होऊ लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा सत्तार यांचे कान टोचून त्यांना माफी मागण्यास सांगितले होते; परंतु सत्तार यांनी जाहीर माफी मागितली नाही. आज त्यांचा कुठेच पत्ता नसल्याचे सांगितले जाते. प्रकरण शांत होईपर्यंत भूमिगत व्हा, अशा सूचना शिंदे-फडणवीस यांनीच सत्तारांना दिल्याचे सांगण्यात येते.











