वराडसिम येथील आगळावेगळा पोळा ! (३५० वर्षांपासून सुरू आहे परंपरा )

0
3

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथील पोळा हा सण गाव दरवाज्याच्या खिडकीतून बैल कुदवण्याची पद्धत या आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा

जवळपास साडे तिनशे वर्षांपासून ते आजतागायत सुरू आहे.

वराडसिम गांव हे जवळपास 12 हजार लोकसंख्येचे गाव असून त्या गावात सर्व समाजाचे लोक राहतात. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी वराडसीम येथील रहिवासी नारायण राघो पाटील (राजपूत) यांना काही एक अपत्य नव्हते. गावात आपले नाव राहावे या उद्देशाने त्यांनी त्याकाळी अवघे पंचवीस रुपये खर्च करून गावाला लाकडी प्रवेशद्वार बांधून दिलेले आहे आज देखील त्या दरवाजावर नारायण पाटील यांचे नाव कोरलेले आपल्याला दिसते. त्या दरवाजावर एक छोटासा बंगला बांधलेला असून पूर्वीच्या काळी या बंगल्यात पहारेकरी राहायचा. रात्री हा दरवाजा बंद करीत असत . रात्री अपरात्री बाहेर गावाहून आलेल्या माणसांची शहानिशा केल्यावर दरवाज्याला असलेल्या अडीच फूट लांब व तीन फूट रुंद असलेल्या खिडकीतूनच त्याला गावात प्रवेश दिला जात होता. हा अवाढव्य गाव दरवाजा एकाच लिंबाच्या झाडापासून बनवला असल्याचे वंशावळ वाचणारे भाट यांच्या पोथीमध्ये या दरवाजाचा उल्लेख आढळतो. कालांतराने या दरवाजाचा पोळा या सणासाठी उपयोग होऊ लागला.

पोळ्याच्या दिवशी सर्व समाज बांधव लोक साधारणता एक वाजता गाव दरवाजा जवळ आपापली बैले घेऊन उभे राहतात. या दरवाजातून प्रथमत: काही शेतकऱ्यांनी आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा पूर्ण झाली असल्यास बैलाच्या सिंगाना बाशिंग बांधलेले असते त्या बैलांना या गाव दरवाज्यातून वाजत गाजत बाहेर काढले जाते. या बैलाला मानाचा बैल म्हटले जाते. त्यानंतर हा गाव दरवाजा बंद केला जातो. व दरवाज्याला असलेली अडीच बाय तीनची खिडकीच तेवढी उघडली जाते. व या खिडकीतून बैल कुदवण्याची शर्यत सुरू होते. व आपलाच बैल पहिल्या क्रमांकाने या खिडक्यातून कुदावा यासाठी सर्व्या ताकदीनिशी जो तो प्रयत्नशील असतो. याच वेळी नारळाच्या दोरीत गुंफलेले पाच नारळाचे तोरण गाव दरवाजावर सोडले जाते. या तोरणाचे नारळाच्या दोरीने जर आंघोळ केली तर असाध्य रोग अथवा भूत पिशाच्चची लागण होत नाही हा आज देखील समज लोकांमध्ये रुजलेला असल्याने नारळाच्या दोरीचे छोटेसे तुकडे तरी आपल्याला मिळावे यासाठी या दोरीवर लोकांची झुंबळ उडते. आजपर्यंत या दरवाजाजवळ काही दुर्घटना घडली हे अजूनही ऐकण्यात नाही.

या खिडकीतून ज्या बैलांने प्रथमतःउडी घेतली त्या शेतकऱ्यांचा ग्रुप ग्रामपंचायत वराडसीम तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला जातो.

यावर्षी देखील दरवाजा बंद करून खिडकीतून बैल कुदविणार असून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी तथा पोलीस उप अधीक्षक प्रशांत दरेकर , सदस्य विलास पाटील, प्रकाश ठाकूर, पोलीस पाटील सचिन वायकोळे, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम सोनवणे, सरपंच निलप्रभा पाचपांडे, उपसरपंच सौ निर्मला चौधरी, कारकून देवेंद्र पाटील, काशिनाथ पाटील यांनी पोळा सण आनंदाने आणि उत्साहाने तसेच शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

Spread the love