जळगाव : ऑनलाइन डिलिव्हरी सेवा देणाऱ्या ब्लिंकिटच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार जळगाव शहरात समोर आला आहे. जळगाव संदेशचे संपादक महेंद्र सोनवणे यांनी केलेल्या ऑनलाइन ऑर्डरच्या डिलिव्हरीमध्ये तब्बल दोन तासांचा विलंब झाल्याचा तसेच संबंधित डिलिव्हरी बॉय गौरव पाटील याने अर्वाच्य भाषेत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महेंद्र सोनवणे यांनी ब्लिंकिटवर ऑर्डर केली होती आणि त्याचे पेमेंट फोनपेच्या माध्यमातून करण्यात आले होते. मात्र, ऑर्डर केल्यानंतर बराच वेळ उलटूनही पार्सल मिळाले नाही. तब्बल दोन तास प्रतीक्षा करूनही ऑर्डर न मिळाल्याने सोनवणे यांनी स्वतः ओमकारेश्वर मंदिर परिसरातील ब्लिंकिटच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली.
कार्यालयात पोहोचल्यानंतरही त्यांना आपल्या ऑर्डरसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. यावेळी सोनवणे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडे “मला तुमच्या सीनियरशी बोलायचे आहे”, अशी विनंती केली. मात्र, डिलिव्हरी बॉय गौरव पाटील याने वरिष्ठांचा संपर्क क्रमांक देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन पेमेंट आधीच झालेले असल्याने ऑर्डरचा मागोवा घेण्यासाठी स्वतः कार्यालयात जाण्याची वेळ सोनवणे यांच्यावर आली.
काही वेळानंतर गौरव पाटील कार्यालयात आल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या किरण नावाच्या कर्मचाऱ्याने त्याच्याकडे सोनवणे यांच्या ऑर्डरबाबत विचारणा केली. त्यावेळी “ती ऑर्डर माझ्याकडेच असून माझ्या बॅगमध्ये पडलेली आहे”, असे गौरव पाटील याने सांगितल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे.
ऑर्डर मिळाल्यानंतर त्यातील डेअरी मिल्क चॉकलेट पूर्णपणे वितळलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. याबाबत सोनवणे यांनी संबंधित डिलिव्हरी बॉयकडे विचारणा केली असता त्याने त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत संभाषण करून गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी सोनवणे यांनी संबंधित प्रकाराची तक्रार करण्याबाबत सांगितले असता, “तुमच्याने होईल ते करा, माझी तक्रार कुठेही करा,” अशा उद्दाम शब्दांत उत्तर देण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हा संवाद ब्लिंकिटच्या कार्यालयातच झाला असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
ऑनलाइन पेमेंट करूनही ग्राहकाला स्वतः कार्यालयात जाऊन दोन तास ऑर्डरसाठी प्रतीक्षा करावी लागणे, ऑर्डर डिलिव्हरी बॉयच्या बॅगमध्ये पडून राहणे, खाद्यपदार्थ वितळलेल्या अवस्थेत मिळणे आणि त्यानंतर ग्राहकासोबत कथित अर्वाच्य भाषेत गैरवर्तन होणे, हा प्रकार ग्राहक सेवा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे.
या संपूर्ण प्रकरणाची ब्लिंकिटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून संबंधित डिलिव्हरी बॉयवर योग्य ती कारवाई करावी, तसेच ग्राहकांशी अशा प्रकारचे गैरवर्तन पुन्हा होणार नाही यासाठी कंपनीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जळगाव संदेशचे संपादक महेंद्र सोनवणे यांनी केली आहे.
ब्लिंकिट कंपनीकडून या गंभीर प्रकाराबाबत काय भूमिका घेतली जाते आणि संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.











