जळगाव, प्रतिनिधी : लग्नाच्या आनंदावर अवघ्या सहा दिवसांतच दु:खाची काळी छाया पसरल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी जळगाव शहरात घडली. विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २१ वर्षीय नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे काका प्रवीण सूर्याजी पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली पाटील यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर परिसरात वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदांपत्य देवदर्शनासाठी गेले होते व काही दिवसांपूर्वीच ते जळगाव येथे परतले होते.
सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका प्रवीण पाटील जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण आटोपल्यानंतर दोघेही दुचाकीने कोळपिंप्रीकडे निघाले. दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत वैशाली पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर प्रवीण पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सासरचे व माहेरचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. नवविवाहितेच्या अकाली निधनामुळे रुग्णालय परिसरात शोककळा पसरली होती. काही दिवसांपूर्वीच नव्या संसाराला सुरुवात झालेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.











