बनावट सोशल मीडिया अकाउंटप्रकरणी नशिराबादमध्ये चौकशी; होमगार्ड ताब्यात

0
2

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने बनावट अकाउंटचा संशय; एआय-जनरेटेड व्हिडिओंच्या प्रसारणाची चौकशी

नशिराबाद (प्रतिनिधी) – तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने अथवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट तयार करून त्यावर एआय-जनरेटेड व्हिडिओ तसेच विविध पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणाचा तपास आता नशिराबादपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईम पोलिसांचे पथक नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती आहे.

या प्रकरणात नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन (रा. ताजनगर) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणातील त्यांची नेमकी भूमिका तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.

दरम्यान, तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांचा आवाज व चेहरा वापरून तयार करण्यात आलेल्या एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडिओप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अशा व्हिडिओंच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आमिष दाखवून नागरिकांना व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितल्याचे तपासात समोर आले आहे.

डिजिटल पुराव्यांची तपासणी

या प्रकरणाच्या तपासात संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सचे आयपी लॉग, मोबाईल व इतर डिजिटल उपकरणे, लिंक्ड अकाउंट्स, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, सबस्क्रायबर तपशील तसेच सोशल मीडिया वापराशी संबंधित अन्य डिजिटल पुरावे तपासले जाण्याची शक्यता आहे.

तमिळनाडू सायबर क्राईम यंत्रणेनेही संबंधित बनावट अकाउंट्सची माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे तपशील मागवला आहे.

चेन्नईला नेण्याची शक्यता

नशिराबाद पोलीस ठाण्यात मोहम्मद जुनेद शेख यांची चौकशी सुरू असल्याचे समजते. तपासातून समोर येणारे पुरावे आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. आवश्यक असल्यास पुढील चौकशीसाठी त्यांना चेन्नई येथे नेले जाण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

दरम्यान, चौकशी सुरू असून संबंधित व्यक्ती दोषी असल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही. तपासातील निष्कर्षानंतरच या प्रकरणातील नेमकी भूमिका स्पष्ट होणार आहे.

Spread the love