शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अजिंठा चौकाच्या अलीकडेच ममता हॉस्पिटलसमोर पुढे चालणारा कंटेरनर गतिरोधकावर हळू होताच मागून महामंडळाची सुसाट बस कंटेनरवर धडकली.
या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले असून, दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.
जळगाव आगारातून साडेअकराच्या सुमारास जळगाव-भुसावळ बस (एमएच २०, बीएल ९४७) घेऊन चालक देवेंद्र पाटील (वय ४५) भुसावळच्या दिशेने निघाले. बसमध्ये ज्येष्ठ प्रवाशांसह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नोकरी-व्यवसायाला निघालेल्या प्रवाशांनी बस खच्चून भरली होती. स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी, इच्छादेवीमार्गे भुसावळच्या दिशेने जात असताना अजिंठा चौकाच्या अलीकडेच ममता हॉस्पिटलसमोरच महामार्गावरील गतिरोधकावर पुढे चालत असलेल्या कंटेनरचालकाने अचानक ब्रेक लावला.
दोन्ही वाहनांत कमी अंतर असल्याने वेगवान बस मागून कंटेनरवर धडकली. अपघातामुळे बसमधून आरडाओरडा, किंचाळ्यांचा आवाज येऊ लागल्याने परिसरातील रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी गोविंदा पाटील, किशोर पाटील यांनी घटनास्थळ गाठले. जखमींना खाली उतरवत असताना महामार्गावर दोन्ही बाजूला तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
निरीक्षक प्रतापसिंह शिकारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान अली सय्यद, सचिन पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाल्यावर अपघातग्रस्त बस बाजूला करून जखमींना मिळेल त्या वाहनाने जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. काही किरकोळ जखमी प्रवाशांनी न थांबता पर्यायी वाहनाने पुढचा मार्ग निवडला. चालक देवेंद्र पाटील, महिला वाहक भारती रवींद्र इंगळे यांच्यासह तब्बल ३८ प्रवासी जखमी झाले.











