मांसाहाराच्या जाहिरातीं विरोधातील याचिका फेटाळत जैन संस्थांना मुंबई उच्च न्यायालयानं आज दणका दिला. सार्वजनिक ठिकाणी आणि टीव्हीसह इतर मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणारी मांसाहाराशी संबंधित जाहिरातबाजी बंद करण्यात यावी, अशी मागणी जैन संस्थांनी केली होती. टीव्हीवरील जाहिरातींचा त्रास होत असेल तर टीव्ही बंद करा, असं म्हणत हायकोर्टानं ही याचिका फेटाळली आहे.
नेमकी काय मागणी
जैन समुदायातील काही संस्थांच्यावतीनं जगण्याच्या मुलभूत अधिकारांचा दाखला देत याचिका दाखल केली होती. जर कुणाला मांसाहार करायचा असेल तर त्यांनी तो खुशाल करावा, मांसाहाराला आमचा विरोध नाही. पण शाकाहारी लोकांच्या घराजवळ त्याची जाहीरात करणं हे त्या समुदायाच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणल्यासारखं आहे, असा आरोप या जनहीत याचिकेतून करण्यात आला होता.जाहिरातींतून विक्रेते हे प्राणी पक्षांच्या हत्येला प्रोत्साहन देत असल्याचा दावा केला होता.










