जळगाव प्रतिनिधी : पाळधी ते तरसोद महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असताना पाळधीकडून जळगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शांताराम केशव पाटील (वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) यांचा मृत्यू झाला, तर कारमधील चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे दोन वाजता असोदा ते ममुराबाददरम्यानच्या बायपासवर घडला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील ईश्वर महाजन यांची प्रकृती आजारपणामुळे खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नाशिक येथे घेऊन जाण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा रामचंद्र महाजन, नातेवाईक शांताराम पाटील, निखील पाटील तसेच चालक जितेंद्र रामदास सोपारकर हे वाहन क्रमांक एमएच ४८ पी ०७५५ मधून नाशिककडे निघाले.
चालक जितेंद्र सोपारकर यांनी वाहन जळगाव शहरातून न नेता शहराबाहेरील बायपास मार्गाने नेले. दरम्यान, महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या बाजूच्या मार्गावरून दोन्ही दिशेची वाहने ये-जा करीत होती.
कार असोदा ते ममुराबाददरम्यानच्या बायपासवरून जात असताना पाळधीकडून जळगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ०५ डीके ५३१४ क्रमांकाच्या ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील ईश्वर महाजन यांच्यासह रामचंद्र महाजन, निखील पाटील, शांताराम पाटील आणि चालक जितेंद्र सोपारकर गंभीर जखमी झाले.
अपघातात रामचंद्र महाजन यांच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली, तर निखील पाटील यांच्या कपाळाला दुखापत झाली. शांताराम पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता, तर चालक जितेंद्र सोपारकर यांच्या छातीला मुकामार लागला.
महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सर्वांवर उपचार सुरू असताना अपघातानंतर काही वेळाने शांताराम पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, तालुका पोलिसांनी घटनास्थळावरून धडक देणारा ट्रक ताब्यात घेतला असून, ट्रकचालक सती अनंतराम ढिल्लो (रा. साकीनाका, मुंबई) यालाही ताब्यात घेतले आहे. रामचंद्र महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.












